esakal | नांदेडमध्ये आहे ज्येष्ठांना जपणारा ज्येष्ठ नागरिक संघ, कोणता? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांना आधार देण्याचे काम ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी स्थापन केलेला ज्येष्ठ नागरिक संघ करत आहे. लॉकडाउनच्या काळात ज्येष्ठांना या संघांचा मोठा आधार बनला आहे.

नांदेडमध्ये आहे ज्येष्ठांना जपणारा ज्येष्ठ नागरिक संघ, कोणता? ते वाचाच

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे, त्यांच्यामध्ये आनंद निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून २० वर्षांपूर्वी वजिराबाद येथे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली. सद्यस्थितीत या संघाला ज्येष्ठांच्या चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ज्येष्ठ नागरिकांची चळवळ, ज्येष्ठांसाठी विरंगुळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी दिशादर्शक कार्य, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र यावे असे स्थान, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपुलकी वाटावी अशी कार्यरचना अशा अनेक पद्धतीमध्ये वजिराबादेतील ज्येष्ठ नागरिक संघाची दमदार वाटचाल सुरु आहे. यासाठी सुभाषराव बाऱ्हाळे यांचे विविध भूमिकेतून योगदान महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - नांदेड ब्रेकिंग : आज तीन पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ३८

ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आरोग्यविषयक शिबिर, योग, ध्यान धारणा, संस्कार शिबीर, कोजागिरी पौर्णिमा आदी कार्यक्रम नियमित घेतले जातात. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक कौटुंबिक कलह निवारण समिती स्थापन करून ज्येष्ठांच्या अडीअडचणी कौटुंबिक समुपदेशनाच्या माध्यमातून गंगाधरराव नायगावकर, डाॅ. हंसराज वैद्य चोखपणे बजावत आहेत. त्यांच्या या कार्याला मोठे यश येत आहे.

संघाची वैशिष्ट्ये

  • वजिराबाद पोलिस ठाण्यात नियमित बैठका
  • सर्व सण-उत्सव एकत्रित साजरे होतात
  • नियमित ज्येष्ठांसाठी तपासणी शिबिरे
  • प्रत्येक सभासदाला ओळखपत्र
  • शहरात २५० ज्येष्ठ नागरिक संघ
  • कौटुंबिक कलह निवारणासाठी समिती

लॉकडाउनमध्ये भेटला आधार
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे सर्वचजण घरात बसून आहे. परिणामी, ज्येष्ठ नागरिक मानसिक तणावामध्ये आलेले आहेत. त्यांना धीर देण्याचे काम ज्येष्ठ नागरिक संघ करत आहे. संघातील सदस्य एकमेकांना फोन करून त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना आधार मिळत आहे.

भारतीय संविधानातील तरतुदीनुसार मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन हा ज्येष्ठ नागरिकांचा संघ कार्यप्रवण करीत आहे. ज्येष्ठांच्या कार्यक्रमांसाठी बांधलेले नानी पार्कमधील सुधाकरराव डोईफोडे सभागृह विनामूल्य मिळावे, हीच अपेक्षा.
- सुभाषराव बाऱ्हाळे

चंगळवादी संस्कृतीत नैतिकमूल्ये हरवली आहेत. तंत्रानाच्या युगामध्ये घरात कोणाचा कोणाशी संवाद राहिलेला नाही. संस्कार तर शिल्लकच राहिलेले नाहीत. ज्येष्ठांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याशी जवळिक साधणे ही आज काळाची गरज आहे.
- सखाराम पोचमवार