नांदेड : नुकसानग्रस्तांसाठी २४४ कोटींची मागणी

जिल्हा प्रशासनाचा अहवाल; पाच लाख ९३ हजार शेतकऱ्यांचे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित
farmer crop damage
farmer crop damage

नांदेड : जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस होऊन तीन लाख ५८ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रातील खरिपासह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या आपत्तीचा फटका पाच लाख ९३ हजार ११७ शेतकऱ्यांना बसला. यात नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या (हेक्टरी सहा हजार आठशे रुपये मदतीच्या) निकषानुसार जिल्हा प्रशासनाने २४४ कोटी १८ लाख २१ हजार आठशे रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातील तब्बल ८० मंडळात अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली. जुलैमध्ये विक्रमी ६०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचे प्रमाण प्रचंड असल्याने नदी, नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली. सखल भागातील पिके पाण्याखाली गेली. यामुळे सात लाख ६३ हजार ६८१ हेक्टर पिकाखालील क्षेत्र असलेल्या जिल्ह्याला फटका बसला.

यात जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग या तीन लाख ५८ हजार ३८६ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ३१ हेक्टरवरील फळपिके असे एकूण तीन लाख ५८ हजरी ७३१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात अतिवृष्टीचा फटका पाच लाख ९३ हजार ११७ शेतकऱ्यांना बसला.

या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वच १६ तालुक्यांकडून नुकसानीची आकडेवारी घेतली. यासाठी एनडीआरएफच्या हेक्टरी सहा हजार आठशे रुपये प्रतिहेक्टर मदतीच्या प्रचलित दरानुसार जिल्ह्यासाठी २४४ कोटी १८ लाख २१ हजार आठशे रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

वाढीव मदत देण्याची मागणी

राज्य शासनाने मागील वर्षी अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई देताना एनडीआरएफच्या सहा हजार आठशे रुपये प्रतिहेक्टर निकषात वाढ करुन हेक्टरी दहा हजार रुपये प्रति हेक्टरनुसार शेतकऱ्यांना मदत दिली होती. यंदा मागील वर्षीपेक्षाही नुकसान अधिक असल्याने वाढीव मदत देण्याची मागणी होत आहे. आता राज्य शासन यात किती वाढ करणार, हे येत्या काही दिवसात कळेल.

मुखेडला बाधित क्षेत्र केवळ ६४५ हेक्टर

डोंगराळ व हलकी जमीन असलेल्या मुखेड तालुक्यात जिल्ह्यात पिकाखालील क्षेत्र किनवटनंतर दुसऱ्या क्रमांकाचे ७५ हजार ५८३ हेक्टर आहे. परंतु ३३ टक्क्यांपेक्षा अधीक नुकसान दाखविताना फक्त ६२५ शेतकर्‍यांचे ६४५ हेक्टरमधील बाधीत झाल्याचे तालुकास्तरावरुन दाखविण्यात आले आहे. यासाठी केवळ ४३ लाख ८६ हजाराची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात नुकसान मोठ्या प्रमाणात असताना मुखेड तालुक्यातच नुकसान कमी झाल्याचा प्रकार शेतकर्‍यांवर अन्याय करणारा असल्याची चर्चा सुरू आहे.

तालुकानिहाय बाधीत शेतकरी, बाधीत क्षेत्र व मागणी रक्कम

तालुका बाधीत शेतकरी बाधीत क्षेत्र मागणी रक्कम

नांदेड ३४,०९८ १७,३३२ ११,८४,९४,१००

अर्धापूर २७,४२६ २०,१६३ १३,७१,०८,४००

कंधार ५९,६८४ ३०,०२५ २०,४२,५०,४००

लोहा ६४,८१५ ३४,६५७ २३,५६,६७,६००

देगलूर २२,५३५ १८,४७४ १२,५६,२३,२००

मुखेड ६२५ ६४५ ४३,८६,०००

बिलोली ३३,२८६ २३,४६२ १५,९५,४१,६००

नायगाव ४२,७३७ २१,१०३ १४,४२,०३,९००

धर्माबाद २८,५५० १५,४९४ १०,६०,४२,६००

उमरी ३३,६४६ १८,२२४ १२,३९,२३,२००

भोकर ४५,२७० २३,९१२ १६,२६,०१,६००

मुदखेड २९,३४३ ७,८२८ ०५,३२,३०,४००

हदगाव ५९,४९२ ३३,८०३ २३,०१,७४,०००

हिमायतनगर ३३,२१५ २७,९५७ १९,०१,०७,६००

किनवट ५३,४५१ ४९,३३२ ३३,५४,५७,६००

माहूर २४,९४३ १६,३२० ११,१०,०९,६००

एकूण ५,९३,११७ ३,५८,७३१ २४४,१८,२१,८००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com