नांदेड : भाजीपाला उत्पादनाला पावसाचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Inflation Vegetable Rates Rise

नांदेड : भाजीपाला उत्पादनाला पावसाचा फटका

नांदेड - कांदा व बटाटे वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अतिवृष्टीमुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि श्रावण महिन्यात मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. चारपटीने दर वाढल्याने गरिबांना मात्र तुरडाळीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र सध्या आहे.

काही दिवसांपूर्वी २० रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता ४० ते ५० रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेल्या डिझेलच्या भावाचा आणि अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. ४० रुपयांना विकली जाणारी गवार, वांगी, भेंडी ८० रुपये किलो अशी विकली जात आहे. प्रत्येक भाज्यांमागे ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे.

शहरामध्ये हराशीसाठी रोजच्या येणाऱ्या गाड्यांमध्ये कमी झाली आहे. आधी प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्यांचा दर आता ६० ते ८० रुपये प्रतिकिलो झाला आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने व पावसामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजी विक्रेते सांगत आहेत.

अतिवृष्टीमुळे भाज्या महागतात. पुढे पाऊस असाच राहिला तर आता श्रावण महिना, नंतर गणेशोत्सव, गौरीपूजन, पितृपक्ष आणि नवरात्र उत्सव, दसरा यामुळे मांसाहार बंद असतो. त्यामुळे, भाज्यांचे सेवन जास्त केले जाते. मात्र, हल्ली भाज्या फार महागल्या आहेत. पाव किलो भाजी आधी पाच ते १० रुपये किलो होती. पण आता २० ते २५ रुपये पाव किलो भाजी खरेदी करावी लागत आहे.

किरकोळ बाजारातील असे आहेत दर (किलोमागे)

 • भेंडी - ८० ते १०० रुपये

 • भोपळा - ४० रुपये (एक)

 • शिमला मिरची - ८० रुपये

 • मिरची - ५० ते ६०

 • दोडके - ६० ते ८० रुपये

 • फुल कोबी - ८० रुपये

 • वांगी - १०० रुपये

 • गवार - ६० रुपये

 • टोमॅटो - ४० ते ५० रुपये

 • चवळी शेंग - ८० रुपये

 • पान कोबी - ५० ते ६० रुपये

 • रान भाजी कर्टुले - १५० ते २०० रुपये

प्रतिक्रिया

भाज्यांचे भाव डिझेलचे दर वाढल्यामुळे वाढले आहे. त्यामुळे भाज्या महागल्यात. ९६ रुपयांपर्यंत डिझेल गेले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च जास्त आहे. तसेच पाऊसही जास्त प्रमाणात आहे. परिणामी भाजीपाला उत्पादन कमी होत आहे. तसेच आता श्रावण महिना असल्याने भाज्यांना मागणी जास्त असते. परंतु, उत्पादन कमी असल्याने भाववाढ झालेली आहे त्याला काही पर्याय नाही.

- भाजी उत्पादक शेतकरी, नांदेड

Web Title: Nanded Heavy Rain Vegetable Production Loss Inflation Rates Rise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..