नांदेड : मनपा पशुवैद्यकीय रुग्णालयात यंत्रांचा अभाव
महापालिका क्षेत्रामध्ये गाई, म्हैस, शेळी, विविध प्रकारचे पाळीव कुत्रे व इतर जातीचे पशुधन मोठ्या प्रमाणावर आहेत.
नांदेड : महापालिका प्रशासनाने शहरातील पशुधन यांना उपचार मिळावा यासाठी 18 फेब्रुवारी 2014 रोजी अशोकनगर येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु केले. रुग्णालयात गंभीर आजार असणाऱ्या पशुधनासाठी सोनोग्राफी, एक्स-रे, रक्ततपासणी यंत्रणाच उपलब्ध नसल्यामुळे येथील आरोग्य विभागाला उपचार करण्यासाठी अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये गाई, म्हैस, शेळी, विविध प्रकारचे पाळीव कुत्रे व इतर जातीचे पशुधन मोठ्या प्रमाणावर आहेत. पशुधन मालकांची मागणी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अशोकनगर येथे 18 फेब्रुवारी 2014 रोजी तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु केले. या रुग्णालयांमध्ये महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात विविध जातीचे पशुधन उपचारासाठी दररोज येत असतात. या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी एक, परिचर एक, शिपाई एक, नोंदणी करण्यासाठी एक कर्मचारी आहे येथे कर्मचाऱ्यांची संख्या देखील अपुरी आहे.
विशेषता पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये विविध जातीचे पाळीव कुत्रे उपचारासाठी येतात. पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असोदोद्दीन व त्यांचे कर्मचारी उपचारासाठी तत्पर असतात. उपलब्ध असलेल्या औषध साठ्यातून उपचार करतात. किंबहुना सलाईन देखील लावून पशुधनाची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु सद्यस्थितीत असलेले पशुवैद्यकीय रुग्णालयात जागादेखील कमी पडत आहे. येथे जर एखाद्या पाळीव प्राणी व पशुधन गंभीर आजार असल्यास त्यांना येथे दोन दिवस ठेवून उपचार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे संबंधित पशुधन मालकास पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नाला रुग्णालयात घेऊन यावे लागते. त्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
सहा वर्षात मनपाच्या तिजोरीत 22 लाख
अशोकनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात 18 फेब्रुवारी 2014 पासून ते 25 नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत एकूण पंचवीस हजार विविध जातीच्या पशुधनावर गेल्या सहा वर्षांमध्ये उपचार करण्यात आला आहे. नोंदणी शुल्कातून महापालिकेच्या तिजोरीत 22 लाख 83 हजार 490 रुपयांची भर पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.