नांदेड : कारवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन; वनविभाग झाला सतर्क

लक्ष्मीकांत मुळे
Wednesday, 20 January 2021

या परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. या परिसरात घडलेल्या घटनेने वनविभाग सतर्क झाला आहे. या परिसरात वनविभाने गस्त ( पेट्रोलींग ) सुरू केली आहे.

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : अर्धापूर तालुक्यात बिबट्याचा संचार सुरूच असून कारवाडी शिवारात एका शेतक-याला सोमवारी (ता. 19) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दर्शन झाले आहे. याच परिसरात काही दिवसापुर्वी  बिबट्याने दोन जनावरे फस्त केली. या परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. या परिसरात घडलेल्या घटनेने वनविभाग सतर्क झाला आहे. या परिसरात वनविभाने गस्त ( पेट्रोलींग ) सुरू केली आहे.

जंगल नष्ट झाल्याने वन्यपप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यांचा अधिवास, आन्नसाखळी आदी समस्या निर्माण झाल्याने हे प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. तालुक्यातील कारवाडी, रोडगी, खैरगाव आदी भागात बिबट्याचा संचार सुरू झाल्याने शेतक-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी मोर्चे बांधणी; बी. आर. कदम, बाबुराव कोंढेकर, प्रवीण देशमुख, डाॅ इंगोले यांची नावे चर्चेत

तालुक्यातील रोडगी शिवरातील अनिल कदम यांच्या शेतातील विहीरीत पडलेला बिबट्याला जीवंत बाहेर काढण्याची घटना गेल्या आठवड्यात झाली होती. या घटनेनंतर काही दिवसातच खैरगाव शिवारात दोन जनावरे फस्त केली होती. त्यानंतर कारवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रामराव वाघमोडे यांना शेतातून घरी येतांना दिसला आहे. सदरील बिबट्या तीन फुट उंचीचा आसल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील सावरगाव, मनाठा, निमगाव आदी भागात वन आहे. या परिसरात वनविभागाने पेट्रोलींग सुरु केली असून शेतकरी, गावक-यांनी रात्री घराचे बाहेर पडू नये. तसेच या भागात दवंडी देण्यात येईल आशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शरयू रूद्रवार यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Leopard sighting in Karwadi nanded news