नांदेड : 'महात्मा बसवेश्‍वरांच्या' अश्‍वारूढ पुतळ्याचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Mahatma Basaveshwar statue Dedication

नांदेड : 'महात्मा बसवेश्‍वरांच्या' अश्‍वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

नांदेड : थोर समाज सुधारक, जगद्ज्योती महात्मा बसवेश्‍वर यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास मोठ्या उत्साहात, उस्फूर्त घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नांदेड शहर, जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने बसवभक्त उपस्थित होते.

येथील कौठा परिसरात उभारण्यात आलेल्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर श्री केदार जगद्गुरु यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. पालकमंत्री अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, शिवाचार्य महाराज, काँग्रेसचे विधान परिषद प्रतोद आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव जवळगावकर, महापौर जयश्री पावडे, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अब्दुल गफार, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर, ओमप्रकाश पोकर्णा, हणमंत पाटील बेटमोगरेकर, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. अविनाश भोसीकर, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे, अतिरिक्त आयुक्त गिरिष कदम, ॲड. निलेश पावडे आदींची उपस्थिती होती. स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, माजी महापौर शैलजा स्वामी, संजय बेळगे, बालाजीराव पांडागळे, प्रवक्ते संतोष पांडागळे, बबन बारसे, श्री. खानापूरकर यांच्यासह महापालिका पदाधिकारी, सदस्यांनी स्वागत केले. सभापती स्वामी यांनी प्रास्ताविक केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर महात्मा बसवेश्वर यांचे नाव ः अशोक चव्हाण

महात्मा बसवेश्वर यांनी जनतेला सामाजिक विचारांसोबत उर्जा, शक्ती देण्याचे काम केले आहे. त्यांचे फक्त राज्यात किंवा देशातच पुतळे नाहीत तर इंग्लडमध्ये देखील पुतळा आहे. त्यामुळे त्यांचे विचार फक्त राज्य किंवा देशापुरतेच मर्यादीत नाहीत तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. त्यांच्याबद्दल जगभरात आस्था, भाव असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. नांदेडला महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा म्हणजे नांदेडवासियांच्या सर्वांच्या प्रेमाचे प्रतिक आहे. या पुतळ्याचे श्रेय देखील सर्व नांदेडकरांचे आहे. शहरात जे काही पुतळे बसविण्यात आले त्या सर्वांतून स्फुर्ती, उर्जा मिळावी, हाच प्रमुख हेतू आहे. माझ्या हातून एक वचनपूर्ती झाली, याचा मला आनंद आहे. भविष्यात देखील ‘सुंदर नांदेड आणि सुरक्षित नांदेड’ करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सध्या देशात आणि राज्यात घडत असलेल्या राजकीय घटनांमध्ये याला, त्याला संपविण्याचा घडत असलेला प्रकार पाहता त्या घटना लोकशाहीला मारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Nanded Mahatma Basaveshwar Statue Dedication Presence Kedar Jagadguru Ashok Chavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top