
महिलांसाठी सुलभ शौचालयावर भर देण्याचा निर्णय
नांदेड : शहरातील मुली, तरूणी तसेच महिलांना घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या अडचणी तसेच मागण्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने महिला बचत गट अथवा महिला एनजीओमार्फत महिलांसाठी सुलभ शौचालय बांधणे व चालविण्याबाबतचा निर्णय गुरूवारी घेण्यात आला.
नांदेड वाघाळा महापालिकेत शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती अपर्णा नेरलकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी स्थायी समिती सभागृहात दुपारी घेण्यात आली. या सभेत महिला बचत गट अथवा महिला एनजीओ मार्फत महिलांसाठी सुलभ शौचालय बांधणे व चालविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर महापालिका शाळेतील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य पुरविणे, महापालिका शाळेतील इयत्ता आठवी त दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणीत, विज्ञान या विषयावर कॉन्टेस्ट परीक्षा स्पर्धेचे आयोजन करणे, महापालिका शाळेतील मुलांसाठी बालवीर मेळावे व सर्व मुलांना शालेय साहित्य वाटप करणे, तसेच क्रीडा कार्यक्रम, शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे दत्तक देणे, रस्ते सुरक्षा व एक झाड, एक महिला उपक्रम आणि आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते त्यास मंजुरीही देण्यात आली.
या बैठकीस उपसभापती आयेशा बेगम शेख असलम, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, उपायुक्त निलेश सुंकेवार, मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, शिक्षणाधिकारी राजेश पातळे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू, समिती सदस्या ज्योत्न्सा गोडबोले, अरशीन कौसर हबीब, मंगला धुळेकर, ज्योती कल्याणकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Web Title: Nanded Mahila Bachat Group Or Mahila Ngo Decision Women Toilets Construction
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..