esakal | नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर यांचा राजीनामा | Nanded Mayor Mohini Yewankar
sakal

बोलून बातमी शोधा

मोहिनी येवनकर

नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर यांचा राजीनामा

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या (Nanded Municipal Corporation) गुरूवारी (ता. ३०) झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसच्या महापौर मोहिनी येवनकर (Mayor Mohini Yewankar) यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने केलेल्या नियोजनानुसार आणि पक्षश्रेष्ठींनी ठरविल्याप्रमाणे त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला असल्याचे महापौर येवनकर यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. महापालिकेची आक्टोंबर २०१७ मध्ये निवडणुक झाली होती. त्यावेळी कॉँग्रेसला जंबो बहुमत मिळाले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि कॉँग्रेस पक्षाने पाच वर्षात चार महापौर देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षात दोन आणि दुसऱ्या अडीच वर्षात दोन महापौर देण्याचे ठरले होते. सध्याचे महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गातील असून त्यासाठी ता. २२ सष्टेंबर २०२० रोजी मोहिनी येवनकर यांची वर्णी महापौरपदी लागली होती. त्यांच्या एक वर्षाचा कार्यकाळ नुकताच झाला आहे. त्यामुळे त्या राजीनामा देणार हे निश्चित होते. दरम्यान, देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक लागली होती. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे त्या महिनाभर तरी राजीनामा देणार नाहीत, अशी चर्चा होती. पण गुरूवारी त्यांनी आॅनलाइन सर्वसाधारण सभेत महापौरपदाचा राजीनामा प्रभारी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडे दिला आहे.

हेही वाचा: किनवटच्या केळीला पंजाबमध्ये मागणी, पण शेतकऱ्यांना भुर्दंड

आता कॉँग्रेसचाच महापौर होणार असून ओबीसी महिला प्रवर्गातील अनेक महिला त्यासाठी इच्छुक आहेत. त्यात जयश्री पावडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाण हे घेतील. दरम्यान, देगलूर पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. महापालिकेने गुरूवारी घेतलेली सभा आणि त्यात महापौरांनी दिलेला राजीनामा यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार भाजपचे विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी केली आहे.

महापौरपद स्विकारले तेव्हा कोरोनाचा संसर्ग सुरू होता. त्यामुळे कोरोनाचे संकट एक आव्हान म्हणून स्विकारले. आरोग्यविषयक कामे करता आली. शहराच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला तसेच त्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कॉँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आणि अधिकारी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

- मोहिनी येवनकर, माजी महापौर.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा - ८१

कॉँग्रेस - ७३

भाजप - सहा

शिवसेना - एक

अपक्ष - एक

loading image
go to top