
Nanded : नांदेड महापालिकेची कर वसुलीसाठी धडक कारवाई; दुकाने, कार्यालये सील; नळ, मलनिःसारण जोडणी खंडित
नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने पन्नास हजाराहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडून कर वसुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पथकाने मंगळवारी (ता. २३) कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी दोन दुकाने, दोन कार्यालये सील करण्यात आली तर एक मलनिःसारण जोडणी आणि एक नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने आणि अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी मालमत्ता कर वसुली वाढविण्यासाठी सूचना दिल्याप्रमाणे उपायुक्त (महसूल) डॉ. पंजाब खानसोळे यांनी मागील वर्षी ५० हजारावरील थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी सक्तीच्या कारवाई करण्यात याव्यात, यासाठी बैठकीत सुचना दिल्या. त्यानुसार मंगळवारपासून (ता. २३) पथकाद्वारे कार्यवाहीस सुरूवात झाली.
मालमत्ता कर भरणा करण्यास नकार दिल्याने आणि सव्वालाख रुपये कर थकीत असल्याने दोन कार्यालये सील करण्यात आली. तसेच एकाकडे ४२ हजार तर दुसऱ्याकडे ९७ हजार रुपये थकबाकी असल्याने दोन दुकाने सील करण्यात आली. एकाकडे दीड लाख कर थकीत असल्याने मलनिःसारण जोडणी खंडीत करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय गणेशनगर अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे यांच्यासह पथकातील कर्मचारी राहूलसिंह चौधरी, पुरुषोत्तम कामतगीकर, मेघराज जोंधळे, विजय मोडके, सचिन धोत्रे, कांबळे आदींनी सहभाग नोंदविला.
क्षेत्रीय कार्यालय इतवारा अंतर्गत दीड लाख रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने नळ खंडीत करण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे यांच्यासह पथकातील कर्मचारी जी. जी. तोटावार, सय्यद हबीब, आसिफ खान, रवी बनसोडे यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, नागरिकांनी थकीत मालमत्ता, पाणीपट्टी कराचा भरणा वेळेवर करावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.