
Nanded : पोलिस जमादाराला लाच घेताना अटक
नांदेड : तीन हजारांची लाच घेणाऱ्या किनवट पोलिस ठाण्यातील जमादार बाळासाहेब नरोबा पांढरे (वय ५६, रा. कमलाईनगर, हदगाव) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदार, त्यांची पत्नी व दोन मुलांविरुध्द किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात आरोपींना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिले,
यापुढे गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी पांढरे याने दहा हजारांची लाच मागितली. त्यातील पाच हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले. उर्वरित पाच हजार रुपये सोमवारी (ता. २०) घेऊन येण्याचे सांगितले होते. याबाबत तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, तडजोडीनंतर तीन हजार घेण्याचे ठरले, असे निष्पन्न झाले. ते स्वीकारताना पांढरे याला पथकाने ताब्यात घेतले. किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक नानासाहेब कदम यांनी दिली.