Nanded : रब्बीच्या पाण्याचे नियोजन ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

Nanded : रब्बीच्या पाण्याचे नियोजन ठरणार

नांदेड : नांदेड पाटबंधारे मंडळातंर्गत धरणाच्या लाभक्षेत्रात रब्बीसाठी पाणी पाळ्या देण्याचे नियोजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा कालवा सल्लगार समितीचे सदस्य सचिवांनी याबाबत जलसंपदा मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनी पालकमंत्र्यांना नियोजन ठरविण्याचे अधिकार दिले आहेत.

नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत लहान - मोठे प्रकल्प आहेत. यंदा पावसाचे प्रमाण अधीक झाल्यामुळे संपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यात शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपुरी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर, पूर्णा प्रकल्प, निम्न मानार या प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पातून लाभ क्षेत्रातील रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्यांचे नियोजन कालवा सल्लागार समितीत ठरते. या समितीचे अध्यक्ष जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पाळ्यांचे नियोजन ठरते.

यामुळे नांदेड पांटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे नियोजनासाठी पत्रव्यवहार केला. याबाबत जलसंपदा मंत्रालयाकडून ता. आठ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून पालकमंत्री अशोक चव्हाण यांना बैठक घेवून नियोजनाचे अधिकार दिले आहेत. नांदेड पाटबंधारे मंडळाकडून समितीच्या सदस्यांना बैठकीसाठी निमंत्रीत करण्यात येणार आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पाळ्यांचे नियोजन ठरणार आहे, अशी माहिती अधिक्षक अभियंता श्री. शेट्टे यांनी दिली.

loading image
go to top