नांदेड : दुचाकी चोरट्यास पोलिस कोठडी, सात दुचाकी जप्त, वजिराबाद पोलिसांची कारवाई

प्रल्हाद कांबळे
Monday, 23 November 2020

वजिराबाद पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हे आपल्या हद्दीत गस्त घालत होते. हे पथक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आले असता त्यांना संशयास्पद फिरत असणारा मोहम्मद रफीक मोहम्मद रफीक (वय 20) राहणार कोटबाजार तालुका कंधार हा आढळून आला.

नांदेड : मागील काही दिवसांपासून शहरातील दुचाकी चोरट्यांनी पोलिसांसमोर एक आव्हान उभे केले होते. दरदिवशी दोन ते चार दुचाकी लंपास झाल्याच्या तक्रारी पोलिस दप्तरी नोंद होत होत्या. अखेर शुक्रवारी एका अट्टल दुचाकी चोरट्यास वजीराबादच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्याच्याकडून सात चोरीच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.

वजिराबाद पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हे आपल्या हद्दीत गस्त घालत होते. हे पथक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आले असता त्यांना संशयास्पद फिरत असणारा मोहम्मद रफीक मोहम्मद रफीक (वय 20) राहणार कोटबाजार तालुका कंधार हा आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच दुचाकी चोरीची त्याने कबुली दिली.

हेही वाचाहिंगोली : खून झालेल्या युवकाच्या पत्नीचा मृतदेह आढळला, शहरात खळबळ

या आरोपीकडून पोलिसांनी सुमारे तीन लाख ५० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. सदर दुचाकी चोरी झाल्याबद्दलच्या कंधार, कळमनुरीसह तेलंगणा राज्यातही तक्रारी दाखल असल्याचे चौकशीतून पुढे आले. आरोपीला पुढील तपासासाठी संबंधित ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे, शेख अब्दुल, गजानन किडे, संजय जाधव, चंद्रकांत बिरादार, रामचंद्र चौरे, जस्प्रीतसिंह शाहू, नितीन भुताळे यांनी केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Seven two-wheeler thieves in police custody nanded news