नांदेड : पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

file photo
file photo

नांदेड : कोरोना संकटातून सामान्य नागरिक अद्यापही सावरला नाही. सर्वसामान्यांची जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरु आहे. अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडली असताना पुन्हा सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे महागाई गगनाला भिडलेली आहे. असे असतानाही केंद्र सरकार महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी आणि महागाईचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (ता. पाच) फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नांदेड (उत्तर) जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी दिली.

देशात महागाईने कहर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार या महागाईला कारणीभूत आहे. देशात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले असल्याने असंख्य लोकांचा रोजगार बुडाला. लाखो हात बेरोजगार झाले अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्याऐवजी मोदी सरकारच्या अनियंत्रित कारभारामुळे महागाई प्रचंड वाढली आहे.

पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेती व्यवसायही मोडकळीस आला आहे. देशाला देशोधडीला लावण्याचे काम करणाऱ्या मोदी सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी, झोपेच्या सोंगातून बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. पाच) फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यानुषंगाणे नांदेड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर हे करणार असून मोर्चास जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शहरप्रमुख सचिन किसवे, तुलजेश यादव, जिल्हा युवा अधिकारी माधव पावडे, महेश खेडकर, महिला आघाडी जिल्हा संघटक डाॅ. निकिता चव्हाण, तालुकाप्रमुख जयवंत कदम, उध्दव शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैलगाडी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com