
नांदेड : 'रौप्य महोत्सवी' वर्षास धुमधडाक्यात सुरुवात
नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सुरूवात झाली. कुसुम सभागृहात पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता नवा मोंढा येथील बाजार समितीच्या मैदानावर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आली.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सायंकाळी सहा वाजता अखिल भारतीय हिंदी हास्य कवी संमेलन होणार आहे तर रविवारी सायंकाळी सहा वाजता गायक आदर्श शिंदे यांचा भीम गितांचा कार्यक्रम नवा मोंढा मैदानावर होणार आहे. कुसुम सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री. चव्हाण यांनी भाषणात अनेक मुद्यांना स्पर्श केला. कोरोनाचा काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. पहिल्या लाटेतच मी बाधित झालो. अनेकजण मला रुग्णवाहिकेपर्यंत सोडायला आले होते. उपचारासाठी मुंबईला जातांना लोकांच्या मनात एक धास्ती होती. अनेकांना ही भेट शेवटीचीच आहे की काय इथपर्यंत भीतीने गाठले होते, असे श्री. चव्हाण म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी श्री. चव्हाण यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी नांदेडच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगत आत्ताचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भरघोस निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे सांगितले.
माजी महापौरांचा गौरव
नांदेड नगरीचे नगराध्यक्ष तसेच महापौरपद भूषविलेल्यांचा श्री. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सुधाकर पांढरे, मंगला निमकर, शैलजा स्वामी, मोहिनी येवऩकर, शीला भवरे, अब्दुल सत्तार, बलवंतसिंग गाडीवाले, प्रकाश मुथा, चंद्रकांत पाटील आदींचा समावेश होता.
तत्कालीन मुख्यमंत्री मुरली मनोहर जोशी यांनी २५ वर्षापूर्वी नांदेड वाघाळा महापालिकेच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासून ते आजपर्यंत महापालिकेच्या कामात अनेक चढउतार आले. परंतू या महापालिकेवर प्रशासकीय व लोकप्रतिनिधी म्हणून आलेल्या व्यक्तींनी विकासकामात तडजोड केली नाही. मागील १५ वर्षापासून शहराच्या गरजा ओळखून विकासकामे करण्यात येत आहेत. यात राजकीय गतीरोधक निर्माण झाले तरी चालतील परंतू विकासकामात अडथळे येता कामा नयेत.
- अशोक चव्हाण, पालकमंत्री.
नांदेड नगरपालिकेपासून ते महापालिकेच्या प्रवासातील विविध संदर्भांना उजाळा देणारा हा महोत्सव आहे. विकासातील कटिबद्धतेला, योगदानाला अधोरेखीत करणारा हा उत्सव आहे. डॉ. शंकरराव चव्हाण हे पहिले नगराध्यक्ष राहिले असून विकासाचा त्यांनी घातलेला पाया हा तेवढाच भक्कम असल्याने या शहराच्या विकासातील काळानारूप निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आपल्या महापालिकेत, पालकमंत्री अशोक चव्हाणा यांच्या नेतृत्वात आहे.
- डी. पी. सावंत, माजी राज्यमंत्री.
Web Title: Nanded Silver Jubilee Year Celebrated Chala Hawa Yeu Dya Program Waghala Municipal Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..