esakal | नांदेड : ट्रान्सजेंडर महाविकास जन आंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्र्याना निवेदन 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तृतीयपंथीयांसाठी पारीत झालेल्या कायद्याची अमलबजावणी करा

नांदेड : ट्रान्सजेंडर महाविकास जन आंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्र्याना निवेदन 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड :  तृतीयपंथी ( ट्रान्सजेंडर ) समुदायातील व्यक्तींना कायदेशीर संरक्षण व अधिकार देणारे ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन आॕफ राईटस्) बिल सन 2019 मध्ये पारीत झाले असून त्या कायद्यानुसार तृतीयपंथीयांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रावधान करण्यात आले आहे. देशात तृतीयपंथी यांची संख्या पन्नास लाख असून नांदेड जिल्ह्यात दीड हजाराच्या जवळपास असल्याचे जन आंदोलनाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. 
त्यांना सामाजिक बहिष्कारासह भेदभाव, शैक्षणिक सुविधांची कमी, बेरोजगारी, आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक सुविधांचा सामना करावा लागतो  हे मानवाधिकाराचे उल्लंघन करणारे अत्यंत जळजळीत उदाहरण आहे.

त्यांच्या जीवनमानात योग्य बदल होण्यासाठी कायदेशीर संरक्षण असलेल्या कायद्याची अमलबजाणी होण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा पुढाकार घेत असून ता.15 मार्च रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यात स्थानिक मागण्याचा समावेश असून प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत. तृतीय पंथीयासाठी नांदेड मनपा हद्दीमध्ये पाच एकर जमीन देण्यात यावी. सन 2016-17 मध्ये मनपामध्ये मंजूर घरकुलांचा ताबा देण्यात यावा आणि उर्वरीत तृतीय पंथीयांना तात्काळ घरकुल मंजूर करावे तसेच लिंगाप्रमाणे ओळख पत्र द्यावे. मदत मागण्यावर बंदी घालण्यात येऊ नये. ट्रान्सजेंडर कोष्टकाप्रमाणे आधार कार्ड, निवडून कार्ड, रेशन कार्ड व ट्रान्सजेंडर कार्ड देण्यात यावे. व्यवसायासाठी किमान दहा लक्ष रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे. पन्नास लाखाचा विमा शासनाने काढावा. शासनाने गोशाळा सुरु करुन द्यावी व प्रत्येक गोशाळेस शंभर गोमाता अनुदान स्वरुपात द्याव्यात. बचत गट स्थापनेची मान्यता द्यावी व शासकीय कक्षाची अमलबजावणी करावी. बँक खाते काढून द्यावे व हक्काची स्मशानभूमी मिळेपर्यंत इतर स्मशानभूमित जागेची व्यवस्था करावी तसेच स्मशानभूमी मंजूर होईपर्यंत तृतीय पंथीयाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीची जबाबदारी शासनाने किंवा मनपाने स्विकारावी.

या मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलन करण्याचा लेखी इशारा ट्रान्सजेंडर महाविकास जन आंदोलन (लाल बावटा) चे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष गौरी देवकर, सचिव कॉ. शेख मगदूम पाशा, कार्याध्यक्ष कॉ. मारोती केंद्रे, कोषाध्यक्ष बीजली बकश, सीटू जिल्हाध्यक्ष कॉ. उज्वला पडलावार यांनी दिला आहे. तसेच निवेदनावर शकडो तृतीय पंथीयांच्या स्वाक्षरी आहेत.
 

loading image