नांदेड : सर्वांगीन विकासातून केला या गावाचा कायापालट, राष्ट्रपतींच्या निर्मलग्रामसह ३५ पुरस्काराने सन्मान

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर
Friday, 30 October 2020

या कामाची
दखल घेवून राष्ट्रीयस्तरावरील निर्मलग्राम पुरस्कारासह राज्य तसेच जिल्हा
स्तरावरील ३५ पुरस्काराने गावाचा सन्मान केला आहे.

नांदेड : नवीन नांदेड शहरापासून जवळच असलेल्या गुंडेगाव (ता.नांदेड)
ग्रामपंचायतीचे वीस वर्षापासून बिनविरोध सरपंच असलेले दासराव हंबर्डे
यांनी अभियांत्रीकीचे उच्च शिक्षण घेवून नोकरीच्या मागे न लागता आपल्या
कौशल्यातून गावाचा कायापालट केला आहे. शेती, शेतीपुरक व्यवसाय,
औद्योगीकीकरण, वृक्ष लागवड, तंटामुक्ती अभियान, जलसंधारण, महिला सबलीकरण,
हगंणदारीमुक्ती, ग्रामस्वच्छता अभियान, लेक वाचवा अभियान, युवक
सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, शेतकरी मार्गदर्शन मेळावे, शेतकरी आत्महत्या
निवारण अभियान आदींच्या माध्यमातून गावाचा कायापालट केला आहे. या कामाची
दखल घेवून राष्ट्रीयस्तरावरील निर्मलग्राम पुरस्कारासह राज्य तसेच जिल्हा
स्तरावरील ३५ पुरस्काराने गावाचा सन्मान केला आहे.


वृक्ष लागवडीमुळे हिरवागार झालेला डोंगर

शेती, शेतीपुरक व्यवसाय असलेले गुंडेगाव

नवीन नांदेड शहराच्या जवळ असलेल्या गुंडेगावची दोन हजारावर लोकसंख्या
आहे. शहराच्या जवळ असले तरी या गावातील मुख्य व्यवसाय शेती व शेतीपुरक
व्यवसाय आहे. पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला या ठिकाणी घेतला जातो.
पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी केळी, ऊस, चारापिके, फळबागा असे बागायती
पिके घेत. शहर जवळ असल्याने दुधाची मागणी पाहता या ठिकाणचे तरुण
दुग्धव्यवसायाकडे वळलेले. पारंपारीक शेतीला आधुनिकतेची जोड नसल्याने
शेतकऱ्यांचे उत्पादन मर्यादीत होते. अशावेळी नुकतेच बी. इ. (मेकॅनिकल)
झालेले दासराव हंबर्डे यांनी गावाची धुरा सांभाळली. त्यांना गावानेही
तितकीच साथ दिली. सर्वांच्या प्रर्यत्नाने गुंडेगावचे नाव देशाच्या
नकाशावर झळकले.

गाव आदर्श करण्यासाठी धडपड

उच्च माध्यमीक शिक्षण नांदेडला झाल्यानंतर दासराव हंबर्डे यांनी १९९२
मध्ये औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातून बी. इ.
(मेकॅनिकल)पदवी प्राप्त केली. त्याकाळी शासकीय नोकरी सहज मिळणारी संधी
त्यांनी सोडून समाज कार्यात वाहून घेतले. गावाचा विकास व्हावा, ही धडपड.
तसेच सामाजीक बांधीलकीच्या भावणेतून गाव आदर्श करण्यासाठी स्वत:ला झोकून
दिले. यातूनच ते १९९८-९९ मध्ये पहिल्यांदा गुंडेगाव ग्रामपंचायतचे
बिनविरोध सरपंच निवडले गेले, ते आजपर्यंत गावची धूरा सांभाळत आहेत. उच्च
शिक्षण झाल्यामुळे शासकीय योजना, प्रशासकीय यंत्रनेसोबत राहून काम
करण्यासाठी अडचण झाली नाही. वीस वर्षापासून बिनविरोध निवड होत असल्याने
गावात सकारात्मक बदल करण्यासाठी वाव मिळाला यातून गावाचा कायापालट
झाल्याने दासराव सांगतात.

स्वच्छतेला प्रथम प्राधान्य

गुंडेवाडी गाव त्या मानाने लहान गाव असले तरी गावात प्रथम स्व्छतेला
महत्व देण्यासाठी मोहिम राबविण्यात आली. ग्रामस्वच्छता अभियानाच्या
माध्यमातून गाव सुंदर करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्येकांच्या घरी
शौचालय उभारुन ते वापरण्याची सवय लावण्यात आली. यामुळे संत गाडगेबाबा
स्वच्छता अभियानातून गावात केवळ २१ दिवसात गाव हंगणदारीमुक्त करण्यात
आले. या कामाची दखल घेवून २००६-०७,२००७-०८ मध्ये सलग गावाला तालुकास्तरीय
पुरस्कार मिळाला. स्वच्छता अभियानासोबतच जिल्हा परिषदेचे म)तत्कालीन
मुख्यकार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतील गावात
शोषखड्डे करुन सांडपाणी व्यवस्थापण करण्यात आले. यामुळे गावात डासांचा
त्रास कमी झाला. परिणामी साथीच्या आजाराला आळा बसून भुगर्भातील जलसंचय
वाढला.


डोंगरावर घनदाट वृक्षलागवड

जलपुनर्भरण स्तंभ (रिचार्ज शॉप्ट) प्रयोग

कमी पर्जन्यमान झालेल्या काळात गावातील सार्वजनिक जलस्त्रोताला पाणी कमी
यायचे. यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून नांदेड जिल्ह्यात जलस्त्रोताजवळ
जलपुनर्भरण स्तंभ (रिचार्ज शॉप्ट) घेवून त्याव्दारे जमिनीत पाणी
पुरविण्याचा प्रयोग राबविण्यात आला. या प्रयोगातून भुगर्भातील पाणी साठा
वाढण्यास मदत झाली. परिणामी गावातील पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा
प्रश्न मिटू लागला. यातूनच गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या
विहीरीजवळ रिचार्ज शॉप्टचा प्रयोग करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी
सूरेश काकाणी यांच्या उपस्थितीत जलपुनर्भरण स्तंभ निर्माण करुन विहीर,
विंधनविहीरींचे बळकटीकरण करण्यात आले.

हेही वाचा - ‘स्वारातीम’ विद्यापीठ परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार

२००८ मध्ये निर्मलग्राम राष्ट्रीय पुरस्कार

गावकरी तसेच सरपंच दासराव हंबर्डे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे
गुंडेगाव निर्मल झाले. राज्य तसेच केंद्र शासनाच्या पथकाने गावाचा सर्वे
केल्यानंतर २००८ मध्ये गावाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या
हस्ते राष्ट्रीय स्तरावरचा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ मिळाला. यानंतर
सार्वजनिक तसेच वयक्तीक स्वच्छतेला गावात अधीक महत्व देण्यात आले.

वड, कडूलिंब, पिंपळ अशा लाखो वृक्षांची लागवड

गुंडेगाव आणि आसदवन या दोन गावाच्या हद्दीत तब्बल अडीचशे एकरचा उंच डोंगर
आहे. या ठिकाणहून पावसाचे पडलेले पाणी वाहून जात असे. यामुळे गावात
उन्हाळा लागला की, विहीर, कुपनलिकेचे पाणी कमी होत होते. यामुळे
गावकऱ्यांनी या डोंगराच्या उताराला सीसीटी, डीप सीसीटी, व्हॅट यासारखे
जलसंधारणाचे उपचार केले. पायथ्याशी सिमेंट बंधारे, वनराइ बंधारे घेतले.
यामुळे पावसाचे पाणी जमितीत मुरले. डोंगर हिरवा झाल्यानंतर याठिकाणी
वृक्षलागवड करण्यात आली. यात अनेक प्रजातींच्या झाडाची लागवड करण्यात
आली. यानंतर एक लाख कडूलिंब, दहा हजार पिंपळ, दहा हजार वडाची झाडे
लावण्यात आली आहेत. सध्या डोंगरावर वृक्षलागवडीमुळे गर्द झाडी झाली आहे.
याच ठिकाणी भोळेश्वर मल्लीनाथ देवस्थान असल्यामुळे सध्या धार्मीक तसेच
पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत आहे.

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात फक्त चार टक्केच पॉझिटिव्ह रुग्ण ​

पंजाब सरकारच्या मंत्र्यांकडून दोन लाख

गुंडेगाव येथील ग्रामविकासाचे काम एकून पंजाब सरकारमधील ग्रामविकास
मंत्री श्री मालूका यांनी गावाला भेट दिली. गावातील स्वच्छता, जलपुनर्भरण
स्तंभ (रिचार्ज शॉप्ट) प्रयोग, वृक्ष लागवड आदी कामाचा प्रभाव
त्यांच्यावर झाला. जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत
त्यांनी गुंडेगावला भेट दिली. गावाच्या विकासाठी श्री. मालूका यांनी दोन
लाख रुपये बक्षीस दिले.

दुग्ध व्यवसायाला चालणा

गाव शहराजवळ असल्याने गावातील अनेकांचा दुधाचा व्यवसाय होता. या
व्यवसायाला चालणा देण्यासाठी गावात दुध डेअरी सुरु करण्यात आली.
शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करुन दुधाचे उत्पादन वाढविण्यात आले.
परिणामी रोज पैसे येवू लागल्याने गावात समृध्दी आली. या व्यवसायाला चालणा
देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्धव्यवयाय
मंत्री महादेव जानकर यांना गावात बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात
आले. यानंतर गावात दुग्ध व्यवसायाला चालणा मिळाली.

गावातील तंटे गावातच मिटविले

गुंडेगावमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती असल्यामुळे मागील अनेक
वर्षापासून तंटा गावाबाहेर गेला नाही. शासनाच्या तंटामुक्ती अभियानाचे
बक्षीसही गावाला मिळाले. यासोबतच गावात फिरते लोक न्यायालयाच्या
माध्यमातून परिसरातील शेती तसेच इतर किरकोळ तंटे जिल्हा
प्रमुख न्यायमुर्तींच्या उपस्थितीत गावात तडजोडीच्या माध्यमातून सोडविण्यात आले.

गावाची वैशिष्ट्ये

  • महिला सबलिकरणातंर्गत बचत गटांची स्थापना
  • व्यसनमुक्ती केंद्राकडून गाव व्यसनमुक्त
  •  दुध डेअरीची स्थापनेतून धवलक्रांती
  •  शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
  • गाव परिसरात उद्योग उभारुन तरुणांना रोजगार
  • कुऱ्हाड बंदीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन
  • वेअर हाऊस, बिज प्रक्रिया केंद्राची स्थापना
  • गावात सीसी रस्ते, नाल्या, शोषखड्डे, पथदिव्ये
  • बालविवाह बंदी, स्त्री भ्रुण हत्या प्रतिबंधक समिती
  • शालेय विद्यार्थ्यांना पोषक मध्यान्ह भोजन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Transformation of the village through all-round development nanded news