Nanded : चार उड्डाणपुलासह पाच महामार्गास मंजुरी द्यावी ; खा. चिखलीकर Nanded Union Minister Nitin Gadkari Five highways | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार प्रताप पाटील चिखलीकर

Nanded : चार उड्डाणपुलासह पाच महामार्गास मंजुरी द्यावी ; खा. चिखलीकर

नांदेड : नांदेड शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. नांदेडकरांना वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त करण्यासाठी नांदेड शहरात चार उड्डाणपुल निर्माण करण्याची गरज आहे.

ग्रामीण भागातील तीन राष्ट्रीय महामार्गास मंजूरी देवून श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथे आयपीएल मॅच सुरु करण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार प्रताप पाटील चिखलीकर करणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने डी.लीट ही मानाची पदवी देण्याचे घोषीत करण्यात आले. त्यानिमित्त नितीन गडकरी शुक्रवारी (ता. २४) नांदेड दौर्‍यावर येत आहेत. दरम्यान श्री. गडकरी हे खासदार यांच्या निवासस्थानी भेट देणार असून, त्यांना शहराच्या विकासासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.

खासदार चिखलीकर यांनी पत्रकात म्हटले की, शहरातील आयटीआय चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, नागार्जूना, नमस्कार चौक असा उड्डाण पुल करण्यात यावा. जुना मोंढा, महावीर चौक, वजीराबाद, कलामंदिर, शिवाजीनगर आयटीआय असा दुसरा उड्डाण पुल मंजूर करावा. आयटीआय ते श्रीनगर, राजकॉर्नर असा तिसरा उड्डाण पुल निर्माण करावा.

जुन्या नांदेड शहरातील बरकतअली कॉम्पलेक्स (देगलूर नाका) वाजेगाव या मार्गावर चौथा उड्डाणपुल तयार करावा, अशी मागणी खासदार चिखलीकर केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करणार आहेत. तसेच नांदेड शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी क्रिकेट स्टेडियम अत्याधुनिक पध्दतीने तयार करण्यात आले आहे. या स्टेडियमवर आयपीएल क्रिकेट मॅच सुरु करण्यास परवानगी देवून नांदेडकरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी मागणीही ते करणार आहेत.

विविध विकासकामांचे आज भूमीपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.२४) दुपारी चाडेचार वाजता हिंगोली गेट स्टेशनरोड गुरुव्दारा मैदान येथे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत त्यांच्या हस्ते मुदखेड - नांदेड या राष्ट्रीय महामार्गाचे भूमीपूजन ऑनलाईन करण्यात येणार आहे. नांदेड - जळकोट, कुंद्राळा - वझर, भोकर - सरसम, बारसगाव - राहटी या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे खासदार चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी कळविले आहे.

नांदेडला गुरु-ता-गद्दीच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असला तरी त्या निधीचे योग्य पध्दतीने नियोजन झाले नसल्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत गेली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शहरात चार उड्डाण पुलास मान्यता देण्याची माझी प्रमुख मागणी आहे.

- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार. नांदेड