
नांदेड : आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी होणार
नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेची आक्टोंबर महिन्यात मुदत संपत असल्यामुळे राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार निवडणुकीसाठी आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी (ता. पाच) सकाळी अकरा वाजता श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.
राज्य निवडणुक आयोगाने ता. २६ जुलैच्या पत्रान्वये नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत, सुनावणी आदी कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. त्यानुसार ही आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये अनुसुचित जाती (महिला), अनुसुचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यात येणार आहेत.
आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर ता. सहा आॅगस्ट रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर ता. सहा ते ता. १२ आॅगस्ट या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण ता. २० आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केले जाईल.
यंदा ३१ प्रभागात ९२ सदस्य
महापालिकेत पूर्वी वीस प्रभाग आणि ८१ सदस्य होते. आता ३१ प्रभाग आणि ९२ सदस्य राहणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आरक्षण सोडत होईल. यामध्ये एकदंरीत अंदाज घेतला तर एससी प्रवर्गासाठी १७ आणि त्यात महिलांसाठी नऊ जागा राखीव, एसटी प्रवर्गासाठी दोन जागा व त्यात एक जागा महिलेसाठी राखीव, ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षणानुसार २५ ठिकाणी आरक्षण सुटण्याची शक्यता असून त्यात १२ जागा महिलांसाठी राखीव असू शकतील. त्याचबरोबर सर्वसाधारणसाठी ४८ जागा राहण्याची शक्यता असून त्यापैकी २४ जागा महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता आहे.
इच्छुकांना लागले वेध...
नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीचे अनेक इच्छुकांना वेध लागले आहेत. काहींनी गेल्या सहा महिन्यांपासूनच त्या दृष्टीने गुडग्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. आपआपल्या प्रभागात त्या दृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे.
Web Title: Nanded Waghala Municipal Elections Reservation Declared To Next Friday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..