नांदेड : शहर वाहतुक शाखेतील महिला पोलिसांचा वाहनधारकांना मनस्ताप

प्रल्हाद कांबळे | Monday, 3 August 2020

गरीब वाहनधारकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतुक शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी वाहनांची फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत.

नांदेड : अगोदरच मागील चार महिण्यापासून कोरोनाच्या महासंकटात नांदेडकर अडकले आहेत. सततच्या लॉकडाउनमुळे घरातून बेहर पडणे अनेकांना जमत नाही. मात्र आता काही प्रमाणात लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे हातावर पोट असणारे घराबाहेर पडत आहेत. गरीब वाहनधारकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतुक शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी वाहनांची फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत. तसेच अनेक वाहनधारकांशी हुज्जत घालून अपमानीत करत आहेत. विशेष म्हणजे यात अनेक वाहनधारकांची कुठलीच चुक नसताना हा आर्थीक फटका नाहक सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. 

सध्या शहरवासीय कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या भितीपोटी अनेकजण घरातून बाहेर पडणे पसंद करत नाहीत. मात्र काही जणांना नाईलाजास्तव कामानिमित्त बाहेर पडावे लागते. अशा सर्वसाधारण वाहनधारकांना हेरुन ते समोर जाताच मागुन त्यांच्या वाहनाचा फोटो काढून मोठा दंड आकारण्यात येत आहे. दंड जरी लगेच द्यावा नाही लागला तरी भविष्यात हा दंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना हा आर्थीक फटका बसत आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसांना नेमुन दिलेल्या ठिकाणी त्या कधीच दिसुन येत नाहीत. शहरातील सिग्नलवर वाहतुक शाखेचा कर्मचारी दिसलाकी नक्कीच वाहनधारक वाहतुकीचा नियम तोडत नाहीत. परंतु हे कर्मचारी एखाद्या दुकानासमोर किंवा झाडाखाली जावून आपल्या मोबाईलमध्ये मश्‍गुल असतात. हे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे किंवा नाही हे मात्र सांगता येत नाही. 

हेही वाचाअट्टल गुन्हेगार विक्की चव्हाण गोळीबारात ठार

काही महिला कर्मचारी ठरावीक पॉईन्टच मागुन घेतात

शहरातील अनेक सिग्नलवर वाहतुक शाखेचे कर्मचारी दिसत नाहीत. ज्या कर्मचाऱ्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागते. अनेक कर्मचारी तर ठरावीक पॉईन्ट मागुन घेतात. मात्र काहीजण दिल्या त्या पॉईन्टवर प्रामाणीकपणे कर्तव्य पार पाडतात. त्यांची पोलिस विभागाने वेळोवेळी दखलही घेतली आहे. शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांचे बऱ्याचअंशी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आहे. कारण ते स्वत: रस्त्यावर कर्तव्य बजावतात. मात्र त्यांनाही अशा महिला पोलिस कर्मचाऱ्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुक नियम तोडणाऱ्या वाहनावर कारवाई करायचीच तर मग देगलुर नाका येथे अशा कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली पाहिजे असे वाहनधारकांमधून बोलल्या जात आहे.