नांदेडकरांना कोरोनाची राहिली नाही भीती, तोडले मास्कचे बंधन

प्रमोद चौधरी
Saturday, 7 November 2020

महापालिका आयुक्त, नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन ही मोहीम राबवावी तसेच मोहिमेत सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल? यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा, असे नगर विकास विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये सूचित केले आहे.  

नांदेड : कामानिमित्त बाहेर पडणारे लोक मास्क न वापरताच बिनधास्त जाता दिसून येत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये म्हणून जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी मोहीम राबविण्यासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाने परिपत्रक काढले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्याकरिता मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. लॉकडाउन उठविल्यामुळे नागरिक उद्योग धंदे, व्यापार, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. विशेषतः नागरी भागातील लोक बाहेर पडताना मोठ्या संख्येने मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करतान दिसत नसल्याचे चित्र बघायला मिळत नाही. नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये यासाठी महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतींनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मास्क वापरण्याबाबत व्यापक प्रचार, प्रसार व प्रसिद्धी विविध माध्यमांद्वारे करणे, जागोजागी, मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे, जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधक उपाय करत नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : कुंभार व्यवसायीकांवर संकटाचे ढग

मास्क लावा अन्यथा भरावे लागणार पाचशे रुपये
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, अद्याप धोका पूर्णपणे टळला नाही. काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाटही आली आहे. परंतु, असे असताना नागरिकांची बेफिकीरी मात्र कमालीची वाढली आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा नागरिकांच्या विरोधात आता मोहिम सुरु करण्यात आली आसून मास्क न लावणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसून करण्यात येत आहे.

हे देखील वाचाच - वर्धापन विशेष- भारत स्काऊटस् आणि गाईड चळवळ सर्व स्तरापर्यंत पोहचवा- दिगंबर करंडे

कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता
दिवाळीचा सण काही दिवसांवर आला असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. परंतु, त्यासोबत बेफिकीरीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जणांनी सॅनिटायझरचा वापर करणे सोडले आहे. तसेच सर्रासपणे विनामास्क फिरत आहेत. कोरोनाबाबत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता निष्काळजीपणा करून कोरोनाला आमंत्रण देणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedkar Was No Longer Afraid Of The Corona Nanded News