शिव संप्रदायाचा प्रसार करणारे नंदी महाराज भजन मंडळ

प्रमोद चौधरी
Thursday, 22 October 2020

संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरा चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. रोज सकाळी ते शिव आराधना करीत असत.

नांदेड : बह्यामसिंगनगर येथील पुरुष व महिला नियमित नंदी महाराज मंदिरात भजन-गायनातून शिव संप्रदायाचा प्रचार व प्रसार करत आहेत. विशेष म्हणजे आपली दैनंदिन कामे करून ही सेवा दिली जात आहे.

भस्म उटी रुंडमाळा
हातीं त्रिशूळ नेत्रीं ज्वाळा...
गजचर्म व्याघ्रांबर
कंठी शोभे वासुकी हार...

या अभंगाच्या ओळीतून नरहरी सोनार विश्वाला संदेश देतात, की भस्म उटी रुंडमाळ धारण करणारा, हाती त्रिशुळ असणारा शिवशंकर हा सर्व सुखाचे आगार आहे. त्याच्या चिंतनाने जीवन सुखी होते. अर्थातच नामच सर्व सुखाचे आगार असल्याचे नरहरी सोनार विश्वाला सांगतात.


बह्यामसिंगनगर येथील नंदी महिराज मंदिरात महिला व पुरुष नियमित भजन-गायन करतात

वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगड जाती जमातीच्या संतांनी केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांच्या व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांच्या कलाकुसरला त्यावेळी चांगली प्रसिद्धी होती. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरा चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. रोज सकाळी ते शिव आराधना करीत असत.

हेही वाचा - नांदेड- २०२ कोरोनामुक्त, १०३ पॉझिटिव्ह, दिवसभरात दोघांचा मृत्यू

बह्यामसिंगनगर येथील पुरुष व महिलादेखील शंकराची एकनिष्ठेने भक्ती-आराधना भजन-गायनातून करतात.  सर्वसाधारण कुटुंबातील हे लोक आपली दैनंदिन कामे सांभाळून नियमित भजन-गायन करतात. नमस्कार चौकातून नागपूर हायवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बह्यामसिंगनगर आहे. येथील भगवान शंकराची भक्ती अखंडित सुरु राहण्यासाठी नंदी महाराजांचे मंदिर बांधले. तेथे पुरुषांच्या बरोबरीने महिलाही उत्कृष्ट भजनगायन करून भगवान शंकराची भक्ती करतात.

हे देखील वाचलेच पाहिजे - नांदेड - उद्धट बँक अधिकाऱ्यांना संस्काराची गरज - खासदार हेमंत पाटील संतापले

साधारणतः १९९७  पासून नंदी महाराज पुण्यतिथीनिमित्त शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. जगदगुरु तुकाराम महाराज बीज, ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा, नाथषष्ठी, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री आदी उत्सव भक्तिभावाने मंडळातील सर्व सदस्य साजरे करत आहेत. याशिवाय प्रत्येक सोमवारी, एकादशी व शिवरात्रीला हरिनामाचाही गजर करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandi Maharaj Bhajan Mandal Nanded News