सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेल्या पत्रकारितेची गरज- संदीप काळे 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 January 2021

पत्रकारितेतून समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडत येते असे मत सकाळ समुहाचे संदीप काळे यांनी व्यक्त केले.

नांदेड : सुधाकरराव डोईफोडे काका यांच्या पत्रकारितेमुळे मी घडलो. पत्रकारितेत अनेक संधी असून त्यासाठी युवकांनी काळाप्रमाणे बदलणे गरजेचे आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेल्या पत्रकारितेची गरज असून पत्रकारितेतून समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडत येते, असे मत सकाळ समुहाचे संदीप काळे यांनी व्यक्त केले. ते नांदेड येथे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना बोलत होते. 

जनता दल सेक्युलर व सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार समितीच्या वतीने शनिवारी (ता. २२ ) जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्‍मण शिंदे यांनी केले. याप्रसंगी संपादक शंतनू डोईफोडे यांनी सांगितले की, सुधाकरराव डोईफोडे यांच्या पत्रकारितेतून महाराष्ट्रभर त्यांच्या विचारांचा व पत्रकारितेचा वारसा चालवणारे अनेक पत्रकार निर्माण झाले आहेत. संदीप काळे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. तसेच रेल्वे संघर्ष समितीचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश वर्मा हे मराठवाड्याच्या रेल्वे विकासाच्या लढ्यातील सुधाकरराव डोईफोडे यांचे प्रमुख साथीदार होते. म्हणून उभयतांची समितीने पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात पत्रकार संदीप काळे यांचा नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान केला. तर खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते ओमप्रकाश वर्मा यांना सुधाकरराव डोईफोडे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचानांदेड : सैनिक गोरठकर यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदक

नि: पक्ष व निर्भीड पत्रकारितेत समग्र परिवर्तनाचे बीज

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी बोलतांना म्हणाले की, पत्रकारितेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर पासून ते सुधाकरराव डोईफोडे यांच्या नि: पक्ष व निर्भीड पत्रकारितेत समग्र परिवर्तनाचे बीज होते. मराठवाड्याच्या विकासासाठी या ऐतिहासिक पत्रकारितेचा वारसा, विचार पत्रकारांसारखाच नागरिकांनीही जपला पाहिजे असे प्रतिपादन निसार तांबोळी यांनी केले. 

यांची होती उपस्थिती 

सत्काराला उत्तर देताना श्री संदीप काळे म्हणाले की सुधाकरराव डोईफोडे काका यांच्या पत्रकारितेमुळे मी घडलो. पत्रकारितेत अनेक संधी असून त्यासाठी युवकांनी काळाप्रमाणे बदलणे गरजेचे आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेल्या पत्रकारितेची गरज असून पत्रकारितेतून समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडता येते. त्यांचे प्रश्न सुटू शकतात हा माझा अनुभव आहे. कार्यक्रमास माजी आमदार गंगाधर पटणे, इंजि. द. मा.रेड्डी, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, सूर्यकांत वाणी, डॉ. कारभारी गोरे, चैतन्यबापू देशमुख, डॉ. प्रविण पाटील, डॉ. प्रभाकर कारखेडकर, डॉ. अशोक बेलखोडे, पुष्पा कोकीळ, डॉ. बालाजी कोम्पलवार, प्रा. राजाराम मठ्ठमवार, अॅड. धोंडीबा पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील इतरही घटना घडामोडी वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need for journalism with a sense of social responsibility Sandeep Kale nanded news