‘या’साठी निर्भयांनी मुख्यमंत्र्यांना घातले रक्षाबंधनाचे साकडे 

शिवचरण वावळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून राज्यभरातील साडेपाच हजार निर्भयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना राखी पाठवून अनोख्या पद्धतीने रक्षणाची मागणी केली आहे.

नांदेड : आधीच तोट्यात रुतलेले राज्य परिवहन महामंडळाच्या बसची चाके कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक गर्तेत रुतत चाललेले आहे. सध्या जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु असली तरी, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत केवळ २२ प्रवाशांची वाहतूक करण्याची मुभा आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे सर्वस्त्रोत पूर्णपणे थांबले आहे. परिणामी वेळेवर पगार होत नसल्याने घर चालवायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बसची चाके रुतलेली असल्यामुळे मागील दोन महिण्यापासून एसटी कामगारांच्या वेतनावर विपरीत परिणाम होत होत आहे. कामगारांच्या समस्यांमध्ये दिवसागणीक वाढ होत चालली आहे. आधीच कमी पगार असलेल्या या कामगारांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न समोर उभा ठाकलेला आहे. त्यात प्रशासन रोज वेगवेगळी परिपत्रके काढुन कामगारांची मानसिकता अधिकच हतबल करीत आहे. या आर्थिक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी व कामगारांचे वेतन त्वरित अदा करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीच्या महिला कामगार सदस्या शीला नाईकवाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांनाच थेट मदतीची विनंती केली आहे. 

हेही वाचा- नांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल 70 कोटींचा निधी- अशोक चव्हाण​

निर्भयांना संरक्षणाची ओवाळणी द्यावी 

राखी पौर्णिमेच्या भाऊ-बहिणीच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील निर्भया सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवून कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे. वेतनाचा प्रश्न त्वरीत सोडवावा ही ओवाळणी मंत्र्यांनी निर्भयांना द्यावी अशी मागणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे. 

हेही वाचा- मुखेडच्या चांडोळा सज्जाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात ​

निवेदनाची दखल घ्यावी

राज्यात साडेसात हजार महिला कामगार असून यातील साडेपाच हजार कामगार महिला ह्या निर्भयाच्या सदस्या आहेत. प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवणार आहेत. या निवेदनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांनी त्वरीत घेतली घ्यावी व कोरोना काळात देखील सेवा देत असलेल्या महिला कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यांना न्याय द्यावा 
- शीला नाईकवाडे, राज्य महिला संघटक  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For This Nirbhaya Put Rakshabandhan On The Chief Minister Nanded News