esakal | थकबाकी मुक्त शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार; नांदेड परिमंडळात कृषी ऊर्जा पर्वाची दमदार सुरुवात

बोलून बातमी शोधा

file photo}

यानिमित्ताने जिल्हयातील आठ शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

थकबाकी मुक्त शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार; नांदेड परिमंडळात कृषी ऊर्जा पर्वाची दमदार सुरुवात
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : वीज जोडणी बाबतचे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने व त्वरित सोडविण्यासाठी तसेच कृषी पंपाच्या थकबाकीतून मोठा दिलासा देत शेतकऱ्यांना थेट 66 टक्क्यांची सवलत देण्याच्या उद्देशाने महावितरणने आयोजित केलेल्या कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात नांदेड परिमंडळात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हयातील आठ शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकीतून 66 टक्क्यांची  माफी देत थकबाकी कोरी करून देणे. सहाशे मीटरच्या आत असलेल्या कृषी पंपांना त्वरित वीज जोडणी देणे तसेच 600 मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची वीज जोडणी देण्याच्या उद्देशाने महाकृषी ऊर्जा अभियान राज्यात सर्वत्र राबविले जात आहे.

विद्युत भवन नांदेड येथे मंगळवार (ता. दोन मार्च ) झालेल्या कृषी ऊर्जा पर्व सन्मान सोहळ्यात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार ता. एक मार्च ते 14 एप्रिल 2021 या 45 दिवसांच्या कालावधीत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कृषी ऊर्जा पर्व राबविण्यात येणार आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली व अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कृषिपंपाची थकबाकी मुक्तीचा फायदा घेत संपूर्ण थकबाकी भरलेले थेरबन येथील शेतकरी शंकर वामनराव चालींदरवार उचेगाव येथील मारुतराव रामचंद्र शिंदे, ज्ञानेश्वर बाबाराव शिंदे, कवठा येथील माणिक देवराव धुमाळ यांचा सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कृषी पंपाची नवीन वीज जोडणी कार्यान्वित करण्यात आल्या बाबत बालेगाव येथील शेतकरी रामराव धोंडीबा लोहगावे व राहटी येथील माधव बालाजी गायकवाड यांना वीजजोडणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हरडफ येथील सदाशिव चंद्रभान कदम आणि पळसा येथील माधव किशनराव चिंचोलकर यांना नवीन कृषी पंपाचे कोटेशन प्रदान करून सत्कार करण्यात आला.

महिला दिना निमित्त महिला शेतकऱ्यांचा होणार सत्कार

कृषी ऊर्जा पर्वाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टिने येत्या ४५ दिवसात विविध कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ता. आठ मार्चला महिला दिनाचे औचीत्य साधून ज्या महिला शेतकऱ्यांनी थकबाकी भरून महावितरणला साथ दिली अशा महिलांचा सत्कार उपविभागनिहाय केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप थकबाकी भरली नाही त्यांनी पुढे येवून महावितरणला साथ द्यावी तसेच ज्यांना त्वरीत वीज जोडणी हवी आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या महावितरण कार्यालयात जावून रीतसर अर्ज करावा.
दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ.