परभणी : पालिकेच्या प्रभागरचनेवर मातब्बर खूश

परभणीतील चित्र; 'जादा खुशी, कही गम'ची अनुभूती
Parbhani Municipal Corporation Election 2022
Parbhani Municipal Corporation Election 2022sakal

परभणी : महानगरपालिकेने महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२२ साठी बुधवारी प्रभाग रचना, व्याप्ती, सीमा, लोकसंख्या आदी जाहीर केली. या प्रभाग रचनेवर महापालिकेतील सर्वपक्षीय मातब्बर नगरसेवकांत आनंदाची लाट उसळली आहे. तर, काही जन या रचनेवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

महानगरपालिकेने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. आता यास आयोगाने मंजुरी दिली असून, महापालिकेला प्रभाग रचना, व्याप्ती, लोकसंख्येला प्रसिध्दी देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी बुधवारी शहरातील तीन प्रभाग समित्यांच्या कार्यालयात प्रभाग रचना, प्रभागांच्या सीमारेषा दर्शवणारे फलक लावून प्रसिध्दी दिली. यावेळी नगरसचिव विकास रत्नपारखे, संगणक विभागाचे अदनान कादरी, प्रसिध्दी प्रमुख राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.

जुन्या प्रभागांची तोडफोड

महानगरपालिकेने प्रगणक गट, गुगलमॅप व समसमान लोकसंख्येवर आधारित तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत असलेल्या चार सदस्यीय प्रभागांची त्यामुळे मोठी तोडफोड करण्यात आलेली असून, त्याचा फटका कुणाला बसतो, हे आगामी निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे. वाढलेली लोकसंख्या व प्रभागांच्या संख्येचा तो परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

तीन लाखांवर लोकसंख्या

महानगरपालिकेची सदस्य संख्या ७६ झालेली असून, त्यानुसार शहराची २५ प्रभागांत विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक प्रभाग चार सदस्यांचा तर २४ प्रभाग हे तीन सदस्यांचे राहणार आहे. प्रभाग रचना सन २०११ च्या जनगणना व लोकसंख्येवर आधारित असून, शहराची लोकसंख्या तीन लाख सात हजार १७० दर्शविण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ३७ हजार ६६७ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या तीन हजार ६३२ आहे. अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग चार, सात, २०, २४, २३, ११, १५ व २५ या प्रभागांमध्ये आहे. तर, अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रभाग सहा, एक, १२ व १७ या प्रभागात असून, या प्रभागातील काही जागा राखीव राहण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक नऊ चार सदस्यीय?

शहरातील २५ प्रभागांपैकी सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग नऊ मध्ये असल्याचे दिसून येते. या प्रभागात १७ हजार ६११ लोकसंख्या असून हा प्रभाग शहराच्या मध्यवस्तीत आहे. लोकसंख्या अधिक असल्याने कदाचित हा प्रभाग चार सदस्यीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अन्य प्रभागातील लोकसंख्या १० ते १४ हजार दरम्यान आहे.

मातब्बर नगरसेवकांत आनंदोत्सव

प्रसिद्ध झालेली प्रभाग रचना सर्वपक्षीय मातब्बर बहुतांश नगरसेवकांच्या सोयीची असल्याचे चित्र आहे. अनेकांनी या प्रभागात कामाला देखील सुरवात केल्याचे दिसून येते. या प्रभाग रचनेमुळे अनेकांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याचेही बोलले जाते. परंतु, काही इच्छुक, आजी-माजी नगरसेवकांतून नाराजीची सुर देखील उमटत आहे.

महानगरपालिकेने आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. नागरीकांनी काही आक्षेप असल्यास ता. आठ ते २० जून दरम्यान आपल्या सूचना व हरकती सादर कराव्यात. त्यावर प्राधिकृत अधिकारी यांच्या समक्ष सुनावणी होऊन निर्णय घेतला जाणार असून, आयोगाच्या मंजुरीनंतर नविन प्रभाग रचनेला पुन्हा प्रसिध्दी दिली जाईल.

-देविदास पवार, आयुक्त, महानगरपालिका, परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com