हळद व केळी पिकावरील किड, रोग नियंत्रणाबाबत अशी घ्यावी काळजी 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 19 September 2020

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामपविर्तन (स्मार्ट) तसेच शेतकरी गट व शेतकरी कंपन्यासाठी शासनाकडून देय असणाऱ्या अनुदान योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथे कृषिविभाग व शिवास्था फॉर्मर प्रोडयुसर कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने हळद व केळी पिकावरील किड व रोनियंत्रणाबाबत चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवीशंकर चलवदे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे डॉ. देविकांत देशमुख, तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले व मंडळ कृषि अधिकारी संजय चातरमल आदी उपस्थित होते.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामपविर्तन (स्मार्ट) तसेच शेतकरी गट व शेतकरी कंपन्यासाठी शासनाकडून देय असणाऱ्या अनुदान योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. देशमुख यांनी हळद व केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत (पिकाचे संपुर्ण जीवनचक्र) तसेच त्यावरील विविध ‍किड व रोगांची ओळख, किड रोगाचे रासायनिक व जैविक नियंत्रण आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी सोयाबिन ग्राम बिजोउत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकाऱ्यांनी शेतकरी गट व फॉर्मर प्रोडयुसर कंपनी व महिला बचतगटाची क्षमता बांधणीबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हळद व केळी पिकावरील किड व रोग नियंत्रण चर्चासत्र यशस्वीरीत्या संपन्न झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आता दहा हजार क्षमतेच्या ऑक्सीजन टँक -

जिल्हास्तरीय समितीची नाळेश्वरच्या शेतीला भेट 

नांदेड : कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय समितीने नुकतीच कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील शेतकरी सौ. कमलबाई अन्नाराव धोतरे यांच्या शेतीला भेट दिली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिली आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे प्रतिनिधी सिध्देश्वर मोकळे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, नांदेड पंचायत समितीचे सभापतीचे प्रतिनिधी बबनराव वाघमारे, माजी कृषि सभापती नरहरी वाघ, अतुल वाघ, कृषि अधिकारी पुंडलिक माने, कृषि पर्यवेक्षक करंजकर, कृषि सहाय्यक श्रीमती मोरताडे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शेखर कदम, कृषि अधिकारी श्री चिंचोलकर, सतिश लकडे, प्रेरणा धांडे, श्री वाघ, कृषि सभापती यांचे स्विय्य सहाय्यक श्री. हाळे उपस्थित होते.

नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट 

समितीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन कमलबाई अन्नाराव धोतरे यांनी त्यांचे शेतावर फळबागेत मोसंबी, आंबा आदी फळांची लागवड केली आहे. त्यांनी शेततळे उभारुन त्यात मत्स्य उत्पादन घेतले आहे. यावेळी कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कामांविषयी समाधान व्यक्त करुन नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट दिली व जनावरांना वेळीच उपचार करण्यासाठी निर्देश दिले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pests on turmeric and banana crop should be taken care of nanded news