आता पीएच.डी.च्या मौखिक परीक्षा ऑनलाइन

श्‍याम जाधव
शुक्रवार, 29 मे 2020


जगासह भारतामध्ये सध्या ‘कोविड-१९’ विषाणूंचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. लॉकडाउन परिस्थितीमुळे संशोधक विद्यार्थ्यांना, मार्गदर्शकांना, विषयतज्ज्ञांना एकत्र येऊन पीएच. डी. अंतिम मौखिक परीक्षा घेणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन प्रणालीद्वारे संशोधक विद्यार्थी त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण मार्गदर्शक, विषयतज्ज्ञ, संबंधित अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत परीक्षा घेण्यात येते.

नवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पीएच. डी. आणि एम.फिल. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम मौखिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीद्वारे घेण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा -  अनधिकृत मंगल कार्यालयावर पालिकेचा हातोडा चालणार का?
 

जगासह भारतामध्ये सध्या ‘कोविड-१९’ विषाणूंचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. लॉकडाउन परिस्थितीमुळे संशोधक विद्यार्थ्यांना, मार्गदर्शकांना, विषयतज्ज्ञांना एकत्र येऊन पीएच. डी. अंतिम मौखिक परीक्षा घेणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन प्रणालीद्वारे संशोधक विद्यार्थी त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण मार्गदर्शक, विषयतज्ज्ञ, संबंधित अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर पुढील कारवाई करून विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात येणार आहे. 

पावरपॉइंटद्वारे त्यांच्या कामाचे सादरीकरण 
दरम्यान, विद्यापीठातील भूशास्त्र संकुलामध्ये दोन संशोधक विद्यार्थ्यांची नुकतीच अशाप्रकारे पीएच. डी. ची मौखिक परीक्षा पार पडली आहे. विद्यापीठातील अधिष्ठाता यांच्या कार्यालयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पावरपॉइंटद्वारे त्यांच्या कामाचे सादरीकरण केले. यामध्ये ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. के. विजयकुमार यांच्याद्वारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सदर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये आयआयटी, मुंबईचे बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. सुरेश सी. पटेल, नैनिताल येथील कुमांन विद्यापीठाचे प्रा. संतोषकुमार आणि वाराणसी येथील बनारस विद्यापीठाचे प्रा. एन. व्ही. चलपथीराव यांनी ऑनलाइनद्वारे सहभाग घेतला होता.

ऑनलाइन शिकविले जाणार 
या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये कुठेही खंड पडणार नाही किंवा परीक्षा घेण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदर परीक्षा घेण्यासाठी पदव्युत्तर विभागाचे सहायक कुलसचिव पुरुषोत्तम कुलकर्णी, सिस्टीम एक्स्पर्ट लीना कांबळे, वरिष्ठ लिपिक हेमलता, क. लिपिक आकांक्षा मालेगावकर, शंकर हंबर्डे आदींनी सहाय्य केले. ‘कोविड-१९’चा प्रार्दुभाव कमी होईपर्यंत अशाचप्रकारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कोर्सेसही तयार करून ते ऑनलाइन शिकविले जाणार आहेत. पीएच. डी. च्या कोर्सवर्कचीही शिकवणी ऑनलाइनद्वारे होणार असल्याचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ph.D. Oral Exam Now Online, Nanded News