कहरच ! राम मंदिर वर्गणीच्या मिरवणुकीत चक्क पीआय युनिफॉर्मध्ये थिरकले; पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

राम मंदिर निर्माण करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी हदगाव शहरात रविवारी (ता. १४) फेब्रुवारी रोजी विनापरवानगी मिरवणूक काढण्यात आली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी शासनाने सर्वच कार्यक्रमावर प्रतिबंध घातला आहे.

नांदेड : अयोध्या येथील राम मंदिरच्या बांधकामासाठी संबंध देशभरातून वर्गणी जमा करण्याचे काम सुरु आहे. त्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील विविध तालुकास्तरावर ही वर्गणी गोळा करण्यात येत आहे. अशाच एका वर्गणी गोळा करण्याच्या मिरवणुकीत हदगावचे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी डिजेवर ठेका धरला. त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचा आरोप करत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मिर्झा बेग यांनी पीआय गायकवाड यांना निलंबीत करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

राम मंदिर निर्माण करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी हदगाव शहरात रविवारी (ता. १४) फेब्रुवारी रोजी विनापरवानगी मिरवणूक काढण्यात आली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी शासनाने सर्वच कार्यक्रमावर प्रतिबंध घातला आहे. मात्र पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी विनापरवागनी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग घेतला. एवढेच नाही तर त्यांनी रामभक्तांच्या खांद्यावर बसून सर्वोच्च न्यायालयाच्या डिजेबंदीविरोधी कृत्य केले. कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासन डोळ्यात तेल ओतून आपले कर्तव्य पार पाडतात. परंतु हनुमंत गायकवाड यांना या सर्व बाबीचा विसर पडलेला दिसून येतो.

No photo description available.

मिरवणुकीमध्ये चक्क श्री. गायकवाड यांनी डिजेवर ठेका धरल्याने ते चांगलेच अडचणीत अडकले आहेत. संबंधित ठाणेदाराला निलंबित करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. श्री. गायकवाड यांनी कर्तव्यावर असताना कायद्याची पायमल्ली करत, कुठलीही मनात भीती न बाळगता दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डीजे बंदीचे व कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करत बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. कर्तव्यात कसुर करणाऱ्या हनुमंत गायकवाड यांना निलंबित करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिर्झा बेग यांनी केली आहे. निवेदनाची प्रत विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पाठविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police inspector hanumant gaikwad has been suspended for dancing during the ram mandir subscription procession in hadgaon city