esakal | तीन दिवसांपासून पावसाने दिली दडी; शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे!
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

तीन दिवसांपासून पावसाने दिली दडी; शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे!

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील चारही महसूल मंडळात पावसाने दडी दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही दिवसापूर्वी पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊसच झाला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. परंतु मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही अंशी बियाणे अंकुर फुटण्या आधी जमिनीतच गाडले गेले. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना सुरुवातीलाच आर्थिक फटका बसला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामातील सुरुवातीलाच मोसमी पावसाने धडाकेबाज हजेरी लावून अवघ्या काही वेळेतच पाण्याचं दुर्भिक्ष दूर करत. छोटे- मोठे नाले, ओढे, तलाव वाहते करुन सोडले. मान्सूनच्या पावसाची जोरदार हजेरी पाहून अधिकांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेण्याला प्रथम प्राधान्य दिले. परंतु या आठवड्यात मागील तीन ते चार दिवसांपासून माहूर तालुक्यातील वाई बाजार, सिंदखेड, वानोळा व माहूर महसूल मंडळात पावसाने दडी दिली असून उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने मातीत बी- बियाणे टाकून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

हेही वाचा - चौपदरीकरण पूर्णत्वाकडे; भुसावळ-जळगाव महामार्गावर वाहने सुसाट

एक तर या वर्षी खत, बी बियाणांच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. त्यात सुरुवातीलाच पाऊस धोधो बरसल्याने धूळपेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांचे बी- बियाणे मातीतच दडपले गेले. आणि उशिरा पेरणी केलेल्या शेतामध्ये पावसाने उघडीप दिल्याने अंकुर फुटन्या आधीच बियाणे करपुन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बेजबाबदार नोकरशाहीच्या हलगर्जीपणामुळे पिक विमा पासून वंचित राहिलेल्या माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याही वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गत वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात कापसाला बोंडअळी, तुरीला वडवी तर लॉकडाउनमुळे इतर पिकांना अपेक्षित भाव मिळू शकला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसे उत्पन्न लागले नाही. यावर्षी सुरुवातीला दमदार झालेल्या पावसाने आता ऐन उमेदीच्या काळात दगडी दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून पेरण्या आटोपलेल्या शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहे. एक- दोन दिवसात अपेक्षित पाऊस झाला नाही. तर निश्चितच माहूर तालुक्यातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image