esakal | नांदेड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

नांदेड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : यंदाच्या वर्षी जून महिन्यानंतर आॅगष्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सव्वातीन महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात ता. एक जूनपासून ते ता. १४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९९०.५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १११.१३ टक्के झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान - मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून काही ठिकाणी दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यंदा खरिपाचे नुकसान झाले असले तरी रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी ता. एक जून ते ता. ३१ ऑक्टोबर या पावसाळ्याच्या पाच महिन्यात सरासरी ८९१.३० मिलीमीटर पाऊस पडतो. या वर्षी जून महिन्यात पावसाने दमदार सुरूवात केल्यानंतर जुलैमध्ये काही दिवस पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे पावसाळ्याच्या सव्वातीन महिन्यातच वार्षिक सरासरी ओलांडली. आगामी दीड महिन्याच्या काळातही पावसाची शक्यता असल्यामुळे यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: लस,मास्क नाही तर मोदक नाही! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी देखावा

या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान - मोठे प्रकल्प तुडुंब भरले असून नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात अनेक भागात पूर येऊन नदीकाठच्या भागातील पिके खरडून गेली. तसेच सखल भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या प्रशासनाच्यावतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्यात नांदेड तालुक्यात ९९.८४ आणि माहूर तालुक्यात ९१.८० असे दोन तालुके वगळता इतर १४ तालुक्यांनी शंभर टक्क्यापेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये)
नांदेड ः ९९.८४ टक्के (८२९.१०)
बिलोली ः १३६.६० टक्के (१२४४.३०)
मुखेड ः १२६.८७ टक्के (९८८.२०)
कंधार ः १२०.४७ टक्के (९६७.१०)
लोहा ः १२८.२३ टक्के (१०१९.२०)
हदगाव ः १०२.४१ टक्के (९०१.८०)
भोकर ः १०२.७२ टक्के (९८९.५०)
देगलूर ः १२२.०९ टक्के (१००२.१०)
किनवट ः ११३.०४ टक्के (११६०.५०)
मुदखेड ः १०५.६३ टक्के (८७५.९०)
हिमायतनगर ः ११६.०२ टक्के (१००६.२०)
माहूर ः ९१.८० टक्के (९३३.३०)
धर्माबाद ः १३०.२५ टक्के (१०५०.३०)
उमरी ः १०८.१५ टक्के (९२७.३०)
अर्धापूर ः १२८.५३ टक्के (१०२०.००)
नायगाव ः १३०.६८ टक्के (९४५.५०)
एकूण ः १११.१३ टक्के (९९०.५० मिलीमीटर)

loading image
go to top