esakal | रामनवमी विशेष : रामो राजमणी सदा विजयते- अद्भुत रामायण

बोलून बातमी शोधा

रामनवमी
रामनवमी विशेष : रामो राजमणी सदा विजयते- अद्भुत रामायण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अद्भुत रामायण हे वाल्मिकी लिखित रामायण आहे. यासंबंधात अशी एक गोष्ट सांगितली जाते की एकदा भारद्वाज ऋषींनी वाल्मिकी ऋषींना विनंती केली की मूळ रामायणात वाल्मिकींनी रामाची गोष्ट सांगितली मात्र त्यातील काही अद्भुततेने भरलेला भाग रहस्य म्हणून सांगितला गेला नाही. असे रामायणाचे रहस्य सांगा. त्यावेळी वाल्मिकी ऋषींनी रामायणात न सांगितलेला अद्भुत भाग प्रस्तुत रामायण कथेत सांगितला. म्हणून त्याचे नाव 'अद्भुत रामायण' असे झाले.

अद्भुत रामायण दोन भागांत विभागले जाते. यातील पहिला भाग हा मूळ रामायणाशी पुष्कळ जुळणारा आहे मात्र दुसऱ्या भागात सीतेच्या पराक्रमाचा भाग आहे. या कथेची रचना बहुतांशी रामाभोवती गुंफलेली नसून सीतेभोवती गुंफलेली आहे. अद्भुत रामायणाच्या सुरुवातीलाच वाल्मिकी राम आणि सीतेच्या अवताराचे श्रेष्ठत्व सांगतात. यानुसार राम हा विष्णूचा आणि सीता हा लक्ष्मीचा अवतार असल्याचे मानले गेले आहे.

गोष्टीची सुरुवात त्रिशंकू राजापासून होते. त्रिशंकू राजा हा अयोध्येचा राजा आहे. त्याच्या राणीचे नाव पद्मावती असे असते. राणी पद्मावती विष्णूची मोठी भक्त असते. एका रात्री राणीला स्वप्नात असे दिसते की प्रत्यक्ष देवाने तिला एक दिव्य फळ खायला दिले आणि तिने ते त्वरित खाल्ले. त्या दिव्य फळाच्या सेवनाने राणीला पुत्रप्राप्ती होते. त्या मुलाचे नाव अंबरीश असे ठेवले जाते. अंबरीश राजा अत्यंत तपस्वी आणि सदाचरणी असतो. त्याच्या तपश्चर्येचे फलित म्हणून त्याला देव वर देतात. त्यायोगे राजाला शत्रूपासून आणि ब्रह्म शापापासून संरक्षण मिळते. कालांतराने राजा अंबरीशाला एक कन्या प्राप्त होते. तिचे नाव श्रीमती. ही कन्या अत्यंत अनुपमेय सौंदर्याने युक्त असते.

एके दिवशी राजाच्या दरबारात नारद ऋषी आणि पर्वत ऋषी येतात. दोघेही श्रीमतीच्या सौंदर्यावर मोहित होतात आणि ही कन्या आपल्याला द्यावी अशी राजाला विनंती करतात. राजा म्हणतो की, 'वर निश्चित करण्याचा अधिकार श्रीमतीचा आहे तेव्हा तुम्ही स्वयंवराला या. तिने तुमच्यापैकी कुणालाही वरले तर मी आनंदाने तिचे कन्यादान करीन.' दोघेही ऋषी स्वर्गात परत जातात. दरम्यान दोघांनाही श्रीमतीशी विवाह करण्याची इच्छा असल्याने त्यांच्यात एक सुप्त अहमहमिका निर्माण होते. दोघेही विष्णूला एकांतात भेटतात व आपल्या प्रतिस्पर्धीचे मुख माकडाचे करावे अशी विष्णूला विनंती करतात. विष्णू त्यांना तथास्तु म्हणतो.

स्वयंवराच्या दिवशी दोघेही ऋषी अयोध्येत येतात. याच वेळी विष्णू एक सुंदर राजकुमाराच्या रुपात तिथे येतात व दोन्ही ऋषींच्या मध्ये बसतात. मर्कट मुख असणारे दोन्ही ऋषी पाहून राजकन्या श्रीमतीला धक्का बसतो. ती त्यांच्या मध्ये बसलेल्या राजकुमाराला वरमाला घालते. विष्णूची ही कृती दोन्ही ऋषींना लक्षात येते. ते त्याला शाप देतात की विष्णूला पृथ्वीवर मानव योनीत जन्म घ्यावा लागेल आणि स्त्री विरह सहन करावा लागेल. विष्णू हा शाप मान्य करतात आणि कालांतराने अंबरीश राजाच्या वंशातील श्रेष्ठ राजा दशरथाच्या घरी रामाच्या रुपात जन्म घेतात.

एकदा स्वर्गात विष्णू आणि लक्ष्मी त्यांच्या निवासस्थानी गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. अनेक ऋषी, मुनी, गंधर्व या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कार्यक्रमाच्या गोंधळात लक्ष्मीची दासी नारदाला ढकलते. यामुळे अपमानित झालेले नारद लक्ष्मीला शाप देतात की तू राक्षस कुळात जन्माला येशील आणि तुझा अनौरस बालक म्हणून त्याग केला जाईल.

दुसऱ्या बाजूला लंकेचा राजा रावण गहन तपश्चर्या करुन ब्रह्माला प्रसन्न करुन घेतो. ब्रह्म त्याला दोन वर देतो. एका वराने रावण कोणत्याही देवता किंवा देवतांसमान असणाऱ्या शक्तीकडून मृत्यू न मिळण्याचा वर मागतो. (यात गर्वामुळे तो मानव, प्राणी, ऋषी यांचा समावेश करत नाही.) दुसऱ्या वराने तो एक विचित्र मागणी करतो की जेव्हा तो स्वतः च्याच मुलीवर आसक्त होईल तेव्हा त्याला मृत्यू येईल. ब्रह्म दोन्ही मागण्या मान्य करतो. दोन्ही वर मिळाल्याने उन्मत्त झालेला रावण अनेक राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणतो व स्वतः चे वर्चस्व प्रस्थापित करतो.

एके दिवशी वनात गेला असतांना रावण काही अत्यंत तपस्वी आणि तेजस्वी ऋषींना पाहतो. त्याला वाटते की जर मी यांच्यावर अधिपत्य प्रस्थापित केले तर मला कुणाचीही भीती राहणार नाही. म्हणून तो त्यांच्यावर आक्रमण करतो. मात्र ऋषी हत्येने आपली प्रतिमा खराब होईल या जाणिवेने तो बाणाने ऋषींच्या शरीराला छिद्रे पाडतो. याच आश्रमात एक ऋषी लक्ष्मीची आराधना करीत असतात व तिला आपल्या घरी कन्या म्हणून जन्माला येण्याचे आवाहन करीत असतात. ते लक्ष्मीच्या मंत्रांनी अभिमंत्रित दूध एका पात्रात काढून ठेवतात व नदीवर स्नानासाठी जातात. याच दरम्यान रावण ऋषींच्या शरीराला छिद्रे करून त्यातून वाहणारे रक्त गोळा करतो. त्यासाठी तो अनवधानाने हे अभिमंत्रित दूध असलेले पात्र वापरतो.

आपल्या महालात परत आल्यानंतर रावण ते पात्र त्याची पत्नी मंदोदरी हिच्याकडे देतो व सांगतो की, 'या पात्रातील रक्त विषसमान भयानक आहे तेव्हा नीट काळजीपूर्वक ठेऊन दे.' आपल्या पतीच्या घृणास्पद कृत्यांना कंटाळलेली मंदोदरी हेच विष पिऊन मरण पत्करण्याचे ठरवते. मात्र त्यातील अभिमंत्रित दुधाने त्या विषाचा प्रभाव होत नाहीच पण मंदोदरीला गर्भधारणा होते. यामुळे घाबरुन जाऊन मंदोदरी हा गर्भ काढून कुरुक्षेत्रावरील एका मैदानात पुरून टाकते.

दरम्यान, जनक राजा कुरुक्षेत्रावर एक मोठा यज्ञ करण्याचे योजतो. योगायोगाने जिथे मंदोदरीने गर्भ पुरलेला असतो तेच मैदान जनक राजा यज्ञासाठी निश्चित करतो. तिथे यज्ञासाठी नांगरणी करत असताना राजाला पृथ्वीच्या पोटात एक कन्या सापडते. राजा तिला घरी नेतो, तिचे पालनपोषण करतो. या कन्येचे नाव सीता ठेवले जाते.

पुढे राम आणि सीतेच्या विवाहाचे वर्णन प्रस्तुत ग्रंथात आढळत नाही. मात्र विवाहानंतर परत अयोध्येत जात असताना परशुराम रामाने शिवधनुष्य मोडले हे ऐकून त्याला अडवतात. त्यावेळी राम परशुरामाला विराट रुपाचे दर्शन देतात असे वर्णन आहे. पुढे रामाचा वनवास आणि सीतेचे हरण यांचे फारसे वर्णन प्रस्तुत ग्रंथात नाही. हा भाग जवळपास गाळलाच आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. एक संदर्भ असा आढळतो की सीतेच्या शोधात वनात फिरत असतांना ऋष्यमुक पर्वतावर राम- लक्ष्मणाची हनुमानाशी भेट होते. तेव्हा ते तिघेही ओळख पटविण्याच्या दृष्टीने आपापल्या रुपाचे दर्शन देतात. इथे राम विराट रुप दाखवतात, लक्ष्मण शेषनागाचे रुप दाखवतो तर हनुमान रुद्राच्या रुपाचे दर्शन देतो असे म्हटले आहे. यासोबतच इथे राम व हनुमान यांच्यात झालेली शास्त्रचर्चा प्रस्तुत ग्रंथात अगदी सविस्तर दिली आहे. यानंतर सुग्रीवाशी मैत्री, सीतेचा शोध, सेतुबंधन, दशाननाचा वध, सीतेची मुक्तता, रामाचा राज्याभिषेक या सर्व घटना अगदीच थोडक्यात आल्या आहेत.

कथेचा दुसरा भाग रामाच्या राज्याभिषेकानंतर सुरु होते. या कथेनुसार एके दिवशी रामाचा दरबार भरलेला असतो व सर्व ऋषी, नगरजन रामाचे, त्याच्या शौर्याचे कौतुक करत असतात. याचवेळी सीता सहस्रमुख असणाऱ्या रावणाविषयी दरबारात सांगते. सीतेच्या बालपणी जनक राजाकडे आलेल्या एका ऋषींनी तिला सहस्रमुख रावणाबद्दल सांगितले असल्याची माहिती ती देते. पुष्कर नामक बेटावर राहणारा सहस्रमुख रावण हा दशानन रावणाचा मोठा भाऊ असून तो कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असल्याचे ती सांगते आणि त्याचा वध केल्याशिवाय संपूर्ण पृथ्वी सुखी होणार नाही असेही ती सांगते. तिच्या कथनाचा विचार करुन राम सहस्रमुख रावणावर आक्रमण करण्याची योजना आखतात. सुग्रीवाचे वानर सैन्य, विभीषणाचे दैत्य सैन्य अशा विविध सैन्यांना आणि राजांना मदतीसाठी पाचारण करण्यात येते. मोठ्या सैन्यासह राम पुष्कर बेटावर चाल करून जातात.

सैन्याची रणधुमाळी सुरु होते. सुरुवातीला रावणाचे सैन्य आणि रामाच्या सैन्यामधील युद्धाचे वर्णन आहे. यात रामाच्या सैन्याला मोठ्या प्रमाणात विजय मिळतो. हे बघून सहस्रमुख रावण स्वतः रणभूमीवर येतो. तो त्याच्या शक्तीने अत्यंत तीव्र वादळ निर्माण करतो. त्यामुळे रामाचे सर्व सैन्य उडून कुणी अयोध्येत, कुणी किष्किंधा नगरीत तर कुणी लंकेत उडून फेकले जाते. या वादळात केवळ राम आणि सीताच रणभूमीवर राहतात. आपले सगळे सैन्य फार लांब फेकले गेले आहे हे लक्षात आल्यानंतर राम स्वतः युद्धात उतरतात. राम आणि सहस्रमुखी रावण यांच्यात घनघोर युद्ध होते. मात्र रावणाच्या अपार शक्तीपुढे कुणाचाही निभाव लागणे कठीण होते. शेवटी राम ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतात. परंतु रावण ते अस्त्र देखील उडवून लावतो. संतापलेला सहस्रमुखी रावण रामावर बाणांचा वर्षाव करतो. यातील एक बाण वर्मी लागून राम बेशुद्ध होऊन रथात कोसळतात.

कथेचा परमोच्च बिंदू या घटनेनंतर दिसून येतो. रामाला रथात बेशुद्ध पडलेले पाहून सीता संतापते व महाकालीचे रौद्ररुप धारण करून रणांगणात उतरते. या भयानक मृत्यू देवतेच्या रूपाचे प्रस्तुत ग्रंथात सविस्तर वर्णन केले आहे. सीतेचे हे रौद्र शक्ती रूप पाहून देवतांना देखील कंप सुटतो. गळ्यात नरमुंड माळा, काळे कभिन्न अंग, लांब केस, तिच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या अनेक भीषण शक्ती आणि त्यांनी रणभूमीवर घातलेले थैमान याचे वर्णन वाल्मिकी करतात. रक्ताला आसुसलेली ही भयानक काली सर्व राक्षसांचा वध करते आणि शेवटी सहस्रमुखी रावणाचा देखील वध करते. मृत्यूचे नृत्य करणाऱ्या या महाकालीची स्तुती करून सर्व देव तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतात. तिच्या या भयावह रुपामुळे संपूर्ण पृथ्वीचा संहार होईल की काय अशी भीती निर्माण होते. शेवटी ब्रह्म तिला शांत करण्यासाठी पुढे येतात तेव्हा ती रामाला शुद्धीवर आणावयास सांगते. त्यानुसार ब्रह्म रामाला शुद्धीवर आणतात. राम देखील महाकालीचे भयावह रूप पाहून भयग्रस्त होतात. ही महाकाली म्हणजे सिताच आहे हे जाणून ते तिची स्तुती करू लागतात. प्रस्तुत ग्रंथात रामाने महाकालीची १००८ नावे घेऊन स्तुती केल्याचे सांगितले आहे. सर्व देवतांसह रामाने केलेल्या स्तुतीने सीता पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येते. सर्व विजयी वीरांसह राम आणि सीता अयोध्येत परत येतात आणि मोठा विजयोत्सव साजरा करतात.

प्रस्तुत ग्रंथ रामायणाचा एक वेगळाच पैलू आपल्यासमोर खुला करतो. रामाचे कर्तृत्व अधोरेखित करत असतांना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की रामाच्या सोबतीला असणाऱ्या प्रत्येकाचे कर्तृत्व हे त्याच तोलामोलाचे आहे. त्यामुळे रामाचा विजय हा संघटनशक्तीचा विजय आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच वाल्मिकी ऋषींनी जसे रामाच्या अवतारी रूपाचे वर्णन केले आहे तसेच सीतेच्या मूळ स्वरूपाचे देखील वर्णन आहे. सीता ही संपूर्ण विश्वाच्या मागे असणारी सर्जक आणि संहारक शक्ती असल्याचे यात म्हटले आहे. त्या शक्ती रूपाचे दर्शन घडवून देणारी ही अद्भुत रचना म्हणजेच 'अद्भुत रामायण' आहे.

साभार रामायण अभ्यासक