हिमायतनगरात आढळले रॅपिड चाचणीद्वारे चार कोरोना रूग्ण

प्रकाश जैन
Tuesday, 4 August 2020

हिमायतनगर शहरात कोरोनाच्या संसर्गाचा शिरकाव होऊ नये याकरीता प्रशासनाने लक्ष दिले होते. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी देखील येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली होती. (ता.एक) ऑगस्ट रोजी हिमायतनगर शहरातील बजरंग चौक, आंबेडकर चौक, छत्रपती चौक या भागातील चार व्यक्तींची रॅपीड चाचणी घेण्यात आली होती.

हिमायतनगर (जि.नांदेड) : हिमायतनगर शहरातील बजरंग चौक, आंबेडकर चौक, छत्रपती चौक भागातील व्यक्ती कोरोना रूग्ण आढळल्याने रॅपिड चाचणीद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. सदरील परिसर हा कंटेन्मेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

हिमायतनगर शहरात कोरोनाच्या संसर्गाचा शिरकाव होऊ नये याकरीता प्रशासनाने लक्ष दिले होते. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी देखील येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली होती. (ता.एक) ऑगस्ट रोजी हिमायतनगर शहरातील बजरंग चौक, आंबेडकर चौक, छत्रपती चौक या भागातील चार व्यक्तींची रॅपीड चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार चार जण कोरोना रूग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे, वैद्यकिय अधिक्षक डि.डि. गायकवाड यांनी दिली आहे.

चार कोरोना रूग्ण निघाल्यामुळे शहरात खळबळ उडाली असून कोरोना रूग्ण हे अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. या व्यक्तींच्या परिवाराचीही चाचणी देखील घेण्यात आली आहे. शहरातील कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आलेल्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून सदरील परिसरात कुणीही घराबाहेर निघणार नाही, बाहेर फिरणार नाही याची दक्षता पोलिस प्रशासनाने घेण्याचे आदेशही उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. 

सदरील भागात राहणाऱ्या नागरिकांना भाजीपाला, दुध, इतर अत्यावश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगरपंचायतच्या प्रभारी मुख्याधिकारी स्नेहलता स्वामी यांच्याकडे आहे. शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता तोंडाला मास्क आणि नेहमी सॅनिटायझरचा वापर करावा विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन तहसिलदार जाधव, मुख्याधिकारी स्नेहलता स्वामी यांनी केले आहे.

खबरदारी घेतली तरी...

हिमायतनगर तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेतली होती. प्रत्येक मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत होता. गावातील प्रत्येकजण गर्दीच्या ठिकाणी सावधानतेने जायचा. असे असतानाही गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांसोबतच तालुका प्रशासनाची चिंता आता वाढली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid testing found four corona patients in Himayatnagar