शिक्षकांना दिलासा : अर्धापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे घरभाडे कपात करण्यास स्थगिती
अर्धापूर पंचायत समिती कार्यालयांतर्गत मुख्यालयी राहत नसलेल्या कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना घरभाडे भत्ता आदान करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.
नांदेड : ग्रामपंचायतीला आमसभा घेण्यास शासनाची परवानगी मिळेपर्यंत अर्धापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे घरभाडे कपात करण्यास स्थगिती दिली असून तसे रीतसर पत्र ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे शिक्षकांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.
अर्धापूर पंचायत समिती कार्यालयांतर्गत मुख्यालयी राहत नसलेल्या कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना घरभाडे भत्ता आदान करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. तसेच शासनाकडे प्राथमिक राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा नांदेड यांनी देखील ता. २३ ऑगस्ट रोजी घरभाडे मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. शासनाचा ता. नऊ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्णय हा स्वयंस्पष्ट आहे.
हेही वाचा - नांदेड : कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा
परंतु सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग (महामारी) त्या स्वरुपात संपूर्ण जगामध्ये पसरला आहे. त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाच्या वतीने ता. २१ मे २०२० रोजी एक शासन परिपत्रक काढून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७५ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेच्या आयोजनात स्थगिती दिलेली आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा होत नाहीत तोपर्यंत घरभाडे भत्ता मंजूर करता येत नाही. सदर बाब निश्चितच योग्य नाही. त्यामुळे सदर शिक्षकांना घरभाडे भत्ता मंजूर करुन व या कालावधीदरम्यान घरभाडे भत्त्याचा प्रति अतिप्रदान झाल्याचे निदर्शनास आल्यास अतिप्रदानाची वसुली करण्याबाबत शपथपत्र सर्व शिक्षकांकडून घेण्यात यावे. या अटीच्या अधीन राहून घरभाडे भत्ताचे प्रदान करण्यात यावे.
या प्रकरणाबाबत सध्या ग्रामपंचायतीच्या ठरावाचे प्रारुप तयार करावे व नंतर जेव्हा ग्रामसभेचे आयोजन होईल तेव्हा ग्रामसभेत सदर मान्यतेसाठी सादर करावा. असे राज्याचे ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अवर सचिव र. ई. गीरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना कळविले आहे. या प्रश्नासाठी शिक्षक संघाचे अध्यक्ष बंडू भोसले, मुख्याध्यापक श्री सावते, शिवकुमार स्वामी, रंगराव पारसे यांच्यासह आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे संघटनेच्यावतीने आभार मानले.