रेमडेसिव्हिर इंजेक्शन स्वस्त दरात मिळणार , शिफारस महत्त्वाची; विशेष मेडिकल सेवा लवकरच सुरु होणार 

शिवचरण वावळे
Thursday, 15 October 2020

पंतप्रधान कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एका विशेष मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. इंजेक्शन कुणाला द्यायचे याचा सर्वाधिकार जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांनी नेमलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहेत.

नांदेड - सर्वसामान्य गरजवंत कोविडच्या रुग्णास स्वस्तात इंजेक्शन उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एका विशेष मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. इंजेक्शन कुणाला द्यायचे याचा सर्वाधिकार जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांनी नेमलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णास रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासल्यास रुग्णाच्या नातेवाइकांना जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांनी नेमलेल्या वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनची किंमत सामान्य रुग्णांच्या खिशाला परवडत नाही. किंमत जास्त असल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. सामान्यातल्या सामान्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास स्वस्तात औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी दुकानात पाच हजार चारशे रुपये किमतीचे इंजेक्शन लवकरच दोन हजार ३६० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

हेही वाचा- जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल , बुधवारी २५३ कोरोनामुक्त ः ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह​

दिवसाला शंभर इंजेक्शनचा पुरवठा होणार

विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयासमोरील जेनरिक औषधी दुकानात हे इंजेक्शन लवकरच उपलब्ध होणार आहे. रेमडेसिव्हिर औषधी निर्मिती करणाऱ्या कंपनीमार्फत दिवसाला शंभर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुकानदारास हे इंजेक्शन दोन हजार आठशे रुपयास मिळणार असून, त्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदाराना हे इंजेक्शन विक्री करताना केवळ पाच टक्के कमिशनवर विकावे लागणार आहे. त्यामुळे कोविडच्या रुग्णांना आता पाच हजार आठशे ऐवजी दोन हजार ३६० रुपये मोजावे लागणार आहेत. 
कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होताच कंपनीकडून काही दिवसांत रेमडेसिव्हिर इंजेक्शन नांदेडात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो सामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी हे मेडिकल स्टोअर दिलासा देणारे ठरणार आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : सिद्धार्थ जोंधळेच्या मारेकऱ्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ​

इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही

खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अतिगंभीर रुग्णांसाठी दिवसाला किमान एक रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असते; परंतु यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना पाच हजार रुपये खर्च करावे लागतात. बाजारात इंजेक्शनचा तुटवडा असल्यास इंजेक्शनसाठी जास्तीची किंमत मोजावी लागते. मोठ्या शहरात तर पाच हजार चारशे रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात ३० हजार रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे उघड झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी अत्यावश्‍यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन कमी किमतीत अन् वेळेवर उपलब्ध झाल्यास अनेकांचे जीव वाचतील. शिवाय इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही, असे अनेकांना वाटते. 

 सामान्य रुग्णास कमी दरात इजेक्शन
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णास रेमडेसिव्हिर इंजेक्शन अत्यावश्‍यक असते. सध्या हे इंजेक्शन उपलब्ध असले, तरी त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत होते; परंतु प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेतून हेच इंजेक्शन स्वस्त दरात मिळणार आहे. त्याचा अनेकांना लाभ होईल. 
- डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remedivir injection will be available at cheaper rates Recommended Important Special medical services will begin soon Nanded News