प्रस्तावित आदर्श शाळेचा रस्ता बिकटच

nnd01sgp12.jpg
nnd01sgp12.jpg


तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : उमरी जहागीर (ता. हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेचे नाव शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्रस्तावित आदर्श शाळांमध्ये समाविष्ट होण्याचे ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत होत असून या प्रस्तावित आदर्श शाळेकडे जाणारा एकमेव रस्ता मात्र बिकट अवस्थेत आहे. शासनाची आदर्श शाळांबाबतची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. 


तालुक्यातील शाळांमधून उमरी जहागीरच्या शाळेला प्रस्तावित आदर्श शाळेच्या यादीमध्ये समाविष्ट केल्यामुळे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ होण्याबाबत स्थानिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आदर्श शाळा म्हणून विकसित होण्याबाबतचे निकषपात्र ही शाळा ठरली आहे. पाच वर्षांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय सुविधा या त्रिसुत्रीनुसार उमरी येथील शाळा टप्प्याटप्प्याने व नियोजनबद्धरित्या आदर्श म्हणून विकसित होणार आहे. पण शाळेकडे जाणारा एकमेव पांदणरस्ता मात्र विद्यार्थ्यांना बारमाही त्रासदायक आहे. साचलेला चिखल, दलदल, किळसवाणी घाण यातून विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करावी लागते. 

संदेश देणारे मजकूर व चित्र लक्षवेधी 
गावातील विद्यार्थ्यांच्या दोन पिढ्यांनी याच रस्त्याचा वापर नाईलाजास्तव केला आहे. रस्त्याची गरज लक्षात घेऊन याबाबतची मागणी तीस ते चाळीस वर्षापासून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनस्तरावर झाली. गावातील गल्लीबोळात सिमेंटचे रस्ते होत आहेत. पण शाळेसाठी जाणारा रस्ता मात्र अद्यापही उपेक्षा सहन करीत आहे. शाळेला मोठे मैदान असून शिक्षकांनी ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून पटांगण परिसरात सुंदर वनराई फुलविली आहे. शाळेच्या दर्शनी भागातील संरक्षक भिंतीवर राष्ट्रीय,सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, जीवन उपयोगी, पर्यावरण संरक्षण आदी विषयांच्या संदेश देणारे मजकूर व चित्र लक्षवेधी आहेत. शाळेतील झाडांना ड्रिप व सांडपाणी पोहोचवून विकसित केले जात आहे. 

मानसिक त्रासातून मुक्त होण्याची अपेक्षा 
विद्यार्थ्यांच्या वाचनकक्षा वाढवून वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम बालवाचनालय येथे निर्माण करण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी येथील शाळा भौतिक सुविधांच्या बाबतीत चिंतेचा विषय होती. ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ यानुसार अनेक टाकाऊ वस्तूंचा वापर करून भौतिक सुविधा तात्पुरत्या भागविल्या आहेत. गावातील महिला बचत गटांनी परसबागेसाठी काबाडकष्ट करून जमलेले रक्कम दिली. पुंडलिक खांनजोडे यांनी शाळेतील झाडे विकसित होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. तुषार शिंदेनी व्यासपीठासाठी मदत केली. अनेक शिक्षणप्रेमीनी वाढदिवसाचा किंवा तेरवीचा खर्च टाळून शाळेला आर्थिक सहकार्य केले. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी दोन वर्षापासून शाळा उभारण्यासाठी शैक्षणिक दर्जा वाढवून शिस्त विकसित होण्याकरिता परिश्रम घेतले. प्रस्तावित आदर्श शाळेतून येथील विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक बौद्धिक विकास होणार आहे. पण शाळेकडे जाताना रोज घाणीच्या रस्त्यातून होणाऱ्या शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्त होण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com