esakal | सचखंड गुरुद्वारा : चीनच्या सिमेवरील शहीद जवानांच्या कुटुंबियाना ११ लाखाची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गुरतेजसिंघ सह सर्व शहीद सैनिकांच्या स्मरणात गुरुद्वारा श्री अखंडपाठ साहेब आरंभ. वीर शहीद गुरतेजसिंघ यांच्या कुटुंबाला अकरा लाखांची मदत 

सचखंड गुरुद्वारा : चीनच्या सिमेवरील शहीद जवानांच्या कुटुंबियाना ११ लाखाची मदत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर साहेब येथे मंगळवार ता. ३० जून रोजी नुकत्याच भारतीय सीमेवर चीन देशाच्या सैन्य घुसखोरीला रोखण्यासाठी आपल्या जीवाची आहुती देणाऱ्या शहीद गुरतेजसिंघ आणि सर्व हुतात्मा सैनिकांच्या आत्मशांतीसाठी श्री गुरुग्रंथ साहेबाच्या "अखंडपाठ साहेब " सुरु करण्यात आले आहे. 

ता. दोन जुलै रोजी या अखंडपाठची विधिवत समाप्ती (सांगता) होईल. तसेच अरदास करण्यात येईल. तसेच बारा चीनी सैनिकांना यमसदनी पाठवून हुतात्म्य पत्करणाऱ्या युवा वीर सैनिक गुरतेजसिंघ पीता विरसासिंघ याच्या कुटुंबाला गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने अकरा लाख रूपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बोर्डाचे अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा यांनी दिली. 

शौर्य दाखवत बारा चीनी सैनिकांना यमसदनी पाठविले

श्री वाधवा पुढे म्हणाले, देशाच्या पूर्वोत्तर सीमेवर मागे चीनच्या सैनिकातर्फे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या काही घटनामुळे मोठा सैन्य संघर्ष घडून आला. सिमेच्या रक्षणार्थ आपले वीस वीर सैनिकांनी हुतात्म्य पत्कारले. या वेळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील बुधलाडा तालुक्यातील बिरावाला डोगरा या लहान गावातील रहिवाशी गुरतेजसिंघ पिता विरसासिंघ (वय २३ ) याने शौर्य दाखवत बारा चीनी सैनिकांना यमसदनी पाठविले. या संघर्षात त्याला वीरमरण प्राप्त झाले. त्याने देशासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेतली.

हेही वाचा -  कोरोना ब्रेकिंग - नांदेडला बुधवारी चार महिला रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ३९१

श्री अखंडपाठ करण्याचा निर्णय घेतला

गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मनहास, उपाध्यक्ष स. गुरिंदरसिंघ बावा, सेक्रेटरी स. रविंदरसिंघ बुंगई आणि बोर्ड सदस्यांनी शहीद गुरतेजसिंघ व सर्व वीर हौतात्म्य सैनिकांच्या आत्मशांति साठी प्रार्थना (अरदास ) करण्याच्या उद्देश्याने श्री अखंडपाठ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघ जी यांच्या मार्गदर्शनात श्री अखंडपाठ आरंभ करण्यात आले. या वेळी धार्मिक मंडळी उपस्थित होती तसेच वरिष्ठ सहायक अधीक्षक रणजीतसिंघ चिरागिया यांचीही उपस्थिती होती. 

शहीद गुरतेजसिंघ यांच्या कुटुंबाला अकरा लाख रूपये देण्याचा निर्णय

या शिवाय गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने शहीद गुरतेजसिंघ यांच्या कुटुंबाला अकरा लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला. गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदरसिंघ बुंगई आणि बोर्डाचे समन्वयक सदस्य स. परमज्योतसिंघ चाहल मंगळवार (ता. ३०) मुंबईहुन मदतीचा धनादेश घेऊन पंजाबसाठी रवाना झाले असल्याचे वाधवा यांनी सांगितले. ता. दोन जुलै रोजी शहीद गुरतेजसिंघ यांच्या गावात पोहचून मदतीचा धनादेश त्यांच्या कुटुंबियास सुपुर्द करण्यात येईल. 

loading image
go to top