सलून व्यावसायिक पुन्हा संकटात 

Nanded News
Nanded News

नांदेड ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस कडकडीत लॉकडाउन केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. गर्दी टाळण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलून, ब्युटी पार्लर बंद करण्याचे निर्देश दिल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, आता महिनाभर घरातच दाढी, कटींग करण्याची वेळ नागरिकांवर तर सलून व्यावसायिकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नांदेड शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, अमर राजूरकर यांना शुक्रवारी (ता. नऊ) निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटले की, गेल्या वर्षभर बरीचशी आर्थिक आवक ठप्प झाल्याने घरातील जीवनावश्यक गोष्टी कशा पूर्ण करायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल या पार्श्वभूमीवर सलून व्यवसाय सुरु ठेवण्यास बंदी घातल्यामुळे सलून व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली होती. सलून, ब्युटीपार्लर व्यावसायीकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

नाभिक समाज अडचणीत 
बहुतेक सलून व्यावसायीक केवळ याच व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. इतर कोणताही दुसरा जोडधंदा नाही. त्यामुळे घरातील कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी व शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलांचा खर्च तथा दैनंदिन खर्च यासाठी पैसा कुठून उपलब्ध करावा, याची विवंचना त्यांना आहे. परिणामी हातावर पोट असलेला नाभिक समाज कोरोनामुळे पुरता अडचणीत सापडला आहे. निवेदन देतेवेळी माजी जिल्हाध्यक्ष संजय मोगडपल्ले, युवक जिल्हा सचिव जयराम शिंदे, जिल्हा सचिव मोगलाजी लिंगमपल्ले, महानगराध्यक्ष बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. 
 
अशा आहेत मागण्या.... 

  • सलुन दुकाने पूर्ववत सुरु करावेत 
  • सर्व वयोगटातील सलुन कारागीर व व्यावसायिकांना तत्काळ कोरोना लस द्यावी 
  • कोरोना काळातील आत्महत्याग्रस्त सलुन व्यावसायिकांच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी 

सलून व्यवसाय हा अत्यावश्यक सेवामध्ये येतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतर प्रतिष्ठानांसोबतच सलून दुकानेही बंद ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे सलून व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या सोबतच आम्ही काढलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकणार आहेत. यामुळे आमच्यावरील कर्जाचा बोजा वाढणार असल्याने आर्थिक संकट उभे ठाकणार आहे. 
- रमेश मंडाळे, महाराष्ट्र नाभीक महामंडळ, नांदेड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com