जिद्दीला सलाम : व्हीलचेअरचा आधार घेत हवालदार कागणेंची सेवेवर निष्ठा 

प्रल्हाद कांबळे
Monday, 21 September 2020

मागील पंधरा वर्षापासून व्हीलचेअरचा आधार घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपणास दिलेल्या कामावर निष्ठा ठेवत पोलीस हवालदार सूर्यभान कागणे यांची सेवा अनेकांनी आदर्श घेणारी आहे.

नांदेड : कर्तव्यकठोर खात्यात काम करत असताना एका रस्ता अपघातात शरीराचे दोन तुकडे झाले. मात्र सुदैवाने यात बचावले. मागील पंधरा वर्षापासून व्हीलचेअरचा आधार घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपणास दिलेल्या कामावर निष्ठा ठेवत पोलीस हवालदार सूर्यभान कागणे यांची सेवा अनेकांनी आदर्श घेणारी आहे. ते सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागात सेवा बजावत आहेत.

पोलिस हवालदार सूर्यभान कागणे (ब.नं १६२०) यांचा महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत असताना ता. ३० जुलै २००५ रोजी गस्त दरम्यान अपघात झाला होता. या अपघातात कमरेपासून त्यांचे दोन्ही पाय गेले. सुदैवाने ते बचावले. वैद्यकीय सल्ल्यानंतर ते सुट्टीवर गेले. उपचार झाल्यानंतर आपल्या कर्तव्यावर हजर झाले. तत्कालीन पोलीस अधीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी त्यांना सेवेत रुजू करून घेतले. ता. २० मे २००६ पासून व्हीलचेअरचा आधार घेत पुन्हा जनसामान्यांची सेवा बजावत आहेत.

हेही वाचाहजरत सांगडे सुलतान दर्गाचा उरूस रद्द

आतापर्यंत खात्यातील चाळीसहून अधिक बक्षिसे 

त्यानंतर पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाच्या विभागात त्यांनी निष्ठेने काम केले आहे. त्यांना आतापर्यंत खात्यातील चाळीसहून अधिक बक्षिसे मिळाली. सध्या ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिडीत व्यक्तींची समस्या समजून घेऊन त्या पिडीत व्यक्तीला पोलीस अधीक्षक किंवा वरिष्ठांपर्यंत पोचून न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अनेकांची गाऱ्हाणी ही स्थानिक पातळीवर म्हणजेच पोलिस ठाण्यात सोडविण्यासाठी ते संबंधीत ठाणेदार किंवा कर्मचारी यांच्याशी संपर्क साधतात. पीडीत महिला, वृद्ध किंवा कुठलाही व्यक्ती आल्यास त्याला धीर देण्याचे काम श्री. कागणे करत असतात. 

कोरोनामुळे ते सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत

सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पसरत असल्याने वरिष्ठांच्या आदेशावरून ते सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. शहराच्या स्नेहनगर पोलीस वसाहतीत ते आपल्या परिवारासह शासकिय निवास्थानी राहतात. त्यांना एक मीटर अंतर जरी जायचे असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा आधार घ्यावाच लागतो. त्यांना उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवावे लागते. विशेष म्हणजे हा त्रास जरी असला तरी ते साप्ताहीक सुट्टीशिवाय ते रजेवर जात नाहीत. तरीसुद्धा आपल्या कामावरची निष्ठा त्यांनी कधी कमी होऊ दिली नाही. मंगळवारी (ता. २२) सप्टेंबर रोजी ते आपला वाढदिवस साध्या पद्धतीने परिवारात साजरा करणार आहेत.

येथे क्लिक करा - जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरीत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अर्धांगीनी व पाल्य त्यांच्या पाठीमागे बुरजासारखे खंबीर उभे

दैनंदिन गुन्ह्यांची माहिती प्रेसनोटद्वारे सध्या सर्व माध्यमांना ते पुरवत असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी जीवनात हार मानली नाही. कणखर मनाने, जिद्दीने संघर्ष करत कठीण प्रसंगांना तोंड देत आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांच्या या जिद्दीला खरेच सलाम आहे. त्यांच्या अर्धांगीनी व पाल्य त्यांच्या पाठीमागे बुरजासारखे खंबीर उभे आहेत. नांदेड पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांना मोलाचे सहकार्य मिळते. शासनाने त्यांना व्हीलचेअर, अॅक्टिवा दुचाकी दिली. त्याच वाहनावरुन आपल्या एका सहकार्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयात ये- जा करतात. तसेच त्यांना जनसंपर्क कार्यालयातील सहाय्यक फौजदार उत्तम वाघमारे महिला कर्मचारी रेखा इंगळे यांचे मोलाचे सहकार्य मिळत असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salute to the stubborn: Constable Kagane's loyalty to the service based on the wheelchair nanded news