वाळू वाहतूक भोवली : तलाठी संघटनेचा लाचखोर जिल्हाध्यक्ष लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा | Friday, 3 July 2020

मंडळ अधिकारी नन्हु गणपत कानगुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अटक केलेला आरोपी हा तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

नांदेड : कापसी (बु) ता. लोहा परिसरात वाळू वाहतुकीसाठी ३० हजार रुपये मागून १० हजार रुपये स्विकारणाऱ्या मंडळ अधिकारी नन्हु गणपत कानगुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अटक केलेला आरोपी हा तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. ही कारवाई सिडको परिसरात शुक्रवारी (ता. तीन) दुपारी केली.

कापसी बु. (ता. लोहा) परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू व माती उपसा केल्या जातो. वाळू ठेक्यावरुन मोठ्या प्रमाणात रात्री यंत्राच्या साह्याने अवैध वाळू उपसा करून ती रात्रीच पळविण्यासाठी टीप्पर चालतात. अवैध वाळू वाहतुक करण्यासाठी तीन टीप्पर सुरू करायचे आहेत म्हणून तक्रारकर्ता नातेवाईकासाठी मंडळ अधिकारी नन्हू कानगुले याच्याकडे गेला. वाळू वाहतुकीसाठी तीन टीप्पर चालवयाचे आहे असे मंडळ अधिकाऱ्याला सांगितले. यावेळी तीन टीप्पर चालवायचे असतील व त्यावर कारवाई करणार नाही म्हणून दरमहा एका टीप्परला दहा हजार रुपये असे तीन टीप्परचे तिस हजार रुपये मागितले. त्यानंतर लगेच पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये श्री. कानगुले याने स्विकारले. 

हेही वाचाकंधारमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

दहा हजार रुपये पहिला हप्ता स्विकारला

उर्वरीत रक्कम देण्यास इच्छुक नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ता. २८ जून रोजी तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके यांनी ता. ३० जून रोजी पडताळणी सापळा लावला.
यात लोकसेवक कानगुले याने यापूर्वी दहा हजार रुपये पहिला हप्ता घेऊन तडजोडीअंती ठरलेली २१ हजार रुपये घेण्याची मागणी केली. पुन्हा दुसरा हप्ता ११ हजार रुपये स्विकारण्याचे तपासणीत सिद्ध झाले. 

नांदेड ग्रामिण ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात 

यानंतर लगेच कानगुले याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने त्याला त्याच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. तो लोहा तहसिलअंतर्गत कापसी या विभागात मंडळअधिकारी म्हणून मागील अनेक दिवसांपासून संघटनेच्या बळावर कार्यरत होता. नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात लाचखोर नन्हु कानगुले याच्याविरुद्ध लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके, कर्मचारी एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार, विलास राठोड, ताहेर खान, शेख मुजीब यांनी परिश्रम घेतले.