
गद्दारांची प्रत्येक गोष्ट न्यायालयाने उडवून लावली आहे. एकनाथ शिंदे यांची निवडही बेकायदा आहे.
Sanjay Raut : 'मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही'
नांदेड : कागदावर निकाल लागत नाही तर जनता देईल. सध्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे निवडणुका घ्या मग बघा. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. येत्या सष्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि सरकारचाही निकाल लागेल, अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधांवर हल्लाबोल केला.
शिवसेना (ठाकरे) गटाच्या वतीने वामनराव पावडे मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन खासदार राऊत (Sanjay Raut) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, बबन बारसे, माधव पावडे, प्रकाश मारावार, माजी आमदार रोहीदास चव्हाण, उपसभापती भुजंग पाटील डक आदी उपस्थित होते. यावेळी संपर्कप्रमुख थोरात, माजी खासदार वानखेडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
त्यानंतर खासदार राऊत यांनी मार्गदर्शन केले. खासदार राऊत यांनी नांदेडच्या शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेवरच नांदेडकरांनी प्रेम केले म्हणूनच एवढे आमदार आणि खासदार निवडून आले. मोदी आणि शहाच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.
राऊत म्हणाले की, भाजपच्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. मात्र, ते स्वतः वकील आहेत त्यांनी वकीलीही केली आहे. गद्दारांची प्रत्येक गोष्ट न्यायालयाने उडवून लावली आहे. एकनाथ शिंदे यांची निवडही बेकायदा आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. सष्टेंबर, आॅक्टोबर शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि सरकारचाही निकाल लागेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.