नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात झाला एवढा पाणीसाठा

अभय कुळकजाईकर | Friday, 7 August 2020

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मिटला आहे. तसेच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी देखील वेळेवर पेरण्या केल्या.

नांदेड - यंदाच्या वर्षी जून महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ३६६.८७ दलघमी म्हणजेच ४९.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात ८३४.०८ दलघमी म्हणजेच ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील नऊ प्रकल्पात ६४.०१ दलघमी म्हणजेच ६०.५८ टक्के पाणीसाठा गेल्या दोन महिन्यात झाला आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मिटला आहे. तसेच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी देखील वेळेवर पेरण्या केल्या. नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातही ५१३.५७ दलघमी (५३.२७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी इसापूरच्या प्रकल्पात १३.३७ दलघमी (१.४१ टक्के) पाणीसाठा होता. 

हेही वाचा - मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी, कशासाठी? ते वाचाच
 

नांदेड जिल्ह्यात ५० टक्के पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यात मानार आणि विष्णुपुरी हे दोन मोठे प्रकल्प, नऊ उच्च पातळी बंधारे, नऊ मध्यम प्रकल्प, ८८ लघु प्रकल्प आणि चार कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असे एकूण ११२ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा साठवण क्षमता ७४६.१३ दलघमी एवढी आहे. सध्या या ११२ प्रकल्पात ३६६.८७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (४९.१७ टक्के) आहे. विष्णुपुरी प्रकल्प तीनदा भरल्याने एक दरवाजा उघडून गोदावरी नदीत पाणी सोडावे लागले होते. सध्या विष्णुपुरी प्रकल्पात ७१.४७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (८८.४६ टक्के) आहे. मानार प्रकल्पात ९४.१० दलघमी (६८.०८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नऊ मध्यम प्रकल्पात ९५.२७ दलघमी (६८.५१ टक्के), नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ४५.१४ दलघमी (२३.७८ टक्के) तर ८८ लघु प्रकल्पात ६०.८९ दलघमी (३१.९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. चार कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असून त्याचे दरवाजे सध्या उघडण्यात आल्याने त्यात पाणीसाठा नाही. 

हिंगोली जिल्ह्यात ८८ टक्के पाणीसाठा
हिंगोली जिल्ह्यात येलदरी, सिध्देश्वर या दोन मोठ्या प्रकल्पासह २६ लघु आणि दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असे एकूण ३० प्रकल्प आहेत. या प्रकल्पात सध्या ८३४.०८ दलघमी (८८.०७ टक्के) पाणीसाठा आहे. येलदरी प्रकल्पात ७३९.७३ दलघमी (९१.३५ टक्के) एवढा पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी येलदरी प्रकल्पात पाणीसाठाच झाला नव्हता. तशीच अवस्था सिद्धेश्वर प्रकल्पाची गेल्यावर्षी होती. त्याचही शून्य टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र सिद्धेश्वर प्रकल्पातही पाणीसाठा झाला असून सध्या ५२.१६ दलघमी (६४.४२ टक्के) पाणीसाठा आहे. २६ लघु प्रकल्पात ४२.०६ दलघमी (७९.३१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. दोन कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात ०.१४ दलघमी (४.१२ टक्के) पाणीसाठा आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - सावधान, मराठवाड्यातील पिकांवर किडीचा उद्रेक होतोय
   
परभणी जिल्ह्यात ६० टक्के पाणीसाठा

परभणी जिल्ह्यात चार उच्च पातळी बंधारे, तीन लघु प्रकल्प आणि दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असे एकूण नऊ प्रकल्प आहेत. या नऊ प्रकल्पात ६४.०१ दलघमी (६०.५८ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या नऊ प्रकल्पात फक्त १.९४ दलघमी (१.८४ टक्के) पाणीसाठा होता. यंदाच्या वर्षी दोन महिन्यातच चार उच्च पातळी बंधाऱ्यात ५८.६४ दलघमी (५९.५४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. तीन लघु प्रकल्पात ४.३७ दलघमी (शंभर टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तसेच दोन कोल्हापुरी बंधाऱ्यात एक दलघमी (३५.७७ टक्के) पाणीसाठा झाला आहे.