खळबळ : कत्तलीसाठी बांधलेल्या ३४ गोवंशाची सुटका

प्रल्हाद कांबळे | Thursday, 2 July 2020

बांधून ठेवलेल्या ३४ गोवंशाची उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सुटका केली. हे गोवंश शहराच्या नावघाट परिसरात बांधून ठेवले होते

नांदेड : अवैधरित्या कत्तलीसाठी एका गोठ्यात बांधून ठेवलेल्या ३४ गोवंशाची उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सुटका केली. हे गोवंश शहराच्या नावघाट परिसरात बांधून ठेवले होते. ही कारवाई गुरूवारी (ता. दोन) दुपारी करण्यात आली. यावेळी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
नांदेड शहरात बिनदिक्कतपणे गोवंशांच्या कत्तली होत आहेत. खरे तर गोवंश हत्या बंदी कायदा असतांनाही अनधीकृत कत्तलखाने निर्माण करुन गोवंशाच्या कत्तली सुरू आहेत. अशा कत्तली होउ नये म्हणून शहरात व जिल्ह्यात पोलिस विभागाकडून संबंधीतावर कारवाई करण्यात येत असतात. शहराच्या देगलुर नाका परिसरात अधिकतर कत्तली केल्या जात असल्याच्या घटना मागील काही दिवसात पोलिसांच्या झालेल्या कारवायावरुन दिसून येतात. आज पुन्हा नावघाट परिसरात कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील यांना मिळाली. 

 हेही वाचाजिल्ह्यातील पाहिजे असलेल्या पाच जणांना अटक- एलसीबीची कारवाई

डीवायएसपी धनंजय पाटील यांची कारवाई

या माहितीच्या आधारे श्री. पाटील यांनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांना व गुन्हे शोध पथकाचे फौजदार असद शेख यांच्यासह पोलिस प्रविम केंद्रे, रेवननाथ कोळनुरे, प्रमोद कऱ्हाळे, शिवा पाटील, संतोष जाधव, विश्‍वनाथ पवार यांना घेऊन नावघाट परिसरात गस्त सुरू केली. मिळालेल्‍या माहितीवरुन पोलिसांनी एका गोठ्यावर छापा टाकला. हा गोठा पडीत जागेत टीन पत्रे अडवे लावून तयार करण्यात आला होता. अत्यंत अडगळीच्या ठिकाणी असलेला हा गोठा पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. पोलिस कारवाई होण्याचे संकेत मिळताच तेथून काही जण पसार झाले. मात्र एकाला पोलिसांना ताब्यात घेतले.

येथे क्लिक करामुदखेड सिआरपीएफ केंद्रात शॉपींग कॉम्पलेक्स

एक नव्हे दोन नव्हे तर ३४ गोवंश जप्त

गोठ्यातून एक नव्हे दोन नव्हे तर ३४ गोवंश जप्त केले. ही सर्व गोवंश अवैध कत्तलीसाठी बंधून ठेवण्यात आल्याचे ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितले. गोवंश पाहून थोडा पोलिससुद्धा चक्रावून गेले. नांदेड ग्रामिण पोलिसांनी ही सर्व गोवंश जप्त करुन दोन वाहनाद्वारे पोलिस ठाण्यात दाखल केले. त्यानंतर दुपारी उशिरा सर्व गोवंश गोशाळेत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी फौजदार शेख असद यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार संतोष जाधव करत आहेत.