धक्कादायक : पाणीपुरवठ्याच्या टाकीतच आढळला मृतपक्षी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020


हदगाव तालुक्यात जगापूर-गायतोंड गटग्रामपंचायत असून, मौजे जगापूर येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळयोजना पूर्ण झाली आहे. याच पाणीपुरवठ्याच्या टाकीमध्ये मृतपक्षी आढळला असून, परिणामी या योजनेच्या पाइपलाइनमधून घाण पाणी; तसेच त्या पाण्यासोबत पांढऱ्या अळ्या येत असल्याकारणाने ते पाणी पिण्यायोग्य तर नाहीच नाही; परंतु वापरण्यायोग्यही नाही अशी परिस्थिती बघताक्षणी लक्षात येते. या येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

हदगाव, (जि. नांदेड) : जगापूर (ता. हदगाव) येथे पाणीपुरवठ्याच्या टाकीमध्ये मृतपक्षी आढळला असून, सरपंच व पाणीपुरवठा सेवक यांच्या दुर्लक्षामुळे नळाद्वारे अळ्या येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जगापूर येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पाइपलाइनमधून घाण पाणी
हदगाव तालुक्यात जगापूर-गायतोंड गटग्रामपंचायत असून, मौजे जगापूर येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळयोजना पूर्ण झाली आहे. याच पाणीपुरवठ्याच्या टाकीमध्ये मृतपक्षी आढळला असून, परिणामी या योजनेच्या पाइपलाइनमधून घाण पाणी; तसेच त्या पाण्यासोबत पांढऱ्या अळ्या येत असल्याकारणाने ते पाणी पिण्यायोग्य तर नाहीच नाही; परंतु वापरण्यायोग्यही नाही अशी परिस्थिती बघताक्षणी लक्षात येते. या येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीची सूचना सरपंचांना दूरध्वनीद्वारे दिली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर आले नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यात दोन खूनांच्या घटना -

पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती 
जगापूर हे पाणीटंचाईग्रस्त गाव असून, शासनाकडून या गावात पाणी टाकी व नळयोजना मंजूर करत काम पूर्ण झालेले आहे; परंतु या नळयोजनेचा कुठलाही फायदा गावकऱ्यांना होत नाही. चार-चार दिवस पाणी सोडत नसल्याने गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे दररोज पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे असेही गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. निवेदनावर सचिन सोनाळे, राजू मिरटकर, किशन गिरी, किशन बोईनवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधितांविरुद्ध कार्यवाही करण्याची गरज
जगापूर येथे नळाच्या पाइपलाइनद्वारे दूषित पाणी आणि पांढऱ्या अळ्या येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार झाल्याने या प्रकरणात गावकऱ्यांनी सरपंच व पाणीपुरवठा सेवक यांच्या चौकशीची मागणी करीत कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Dead Bird Found In Water Supply Tank, Nanded News