ऑनलाइन कसिनो जुगार अड्ड्यावर सिंदखेड पोलिसांची धाड; नऊ आरोपींसह संगणक संच जप्त

साजीद खान
Thursday, 14 January 2021

वाई बाजारला सध्या मटका बाजार या नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. कारण येथील आठवडी बाजार चौकात केवळ मटका हा मुख्य व्यवसाय झाला आहे

वाई बाजार (जि. नांदेड) : आठवडी बाजार चौकातील खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन कसिनो जुगार अड्ड्यावर बुधवारी (ता. १३)रोजी सायंकाळी सिंदखेड पोलिसांनी अचानक धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेऊन संगणक संच व रोख असा मुद्देमाल जप्त केला. वाई बाजार च्या भर चौकात अचानक पडलेल्या धाडीमुळे जुगाऱ्यांची  चांगलीच धांदल उडाली होती.

वाई बाजारला सध्या मटका बाजार या नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. कारण येथील आठवडी बाजार चौकात केवळ मटका हा मुख्य व्यवसाय झाला आहे. लगतच्या खेड्यापाड्यातून मोलमजुरी करणारे झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापोटी वाई बाजारला येऊन मुंबई,कल्याण,मिलन डे या पारंपारिक मटका जुगार खेळत होते.त्यात आता संगणकावर ऑनलाइन कसिनो फन टारगेट नावाचा मटका पेक्षाही कमी वेळात निकाल देणारा जुगार खेळविला जात आहे. ज्याला राज्य शासनाच्या अर्थ मंत्रालयातील ऑनलाईन लॉटरी विभागाची कुठलीच मान्यता नाही. या ऑनलाईन कसिनोचा आकडा तिथे बसलेला गॅम्बलर काढतो. त्यामुळे यावर पैसे लावणारे झटपट श्रीमंत होण्या ऐवजी झटपट कंगाल होत असतात. मागील अनेक महिन्यापासून खुलेआम सुरू असलेल्या या जुगारावर काल संध्याकाळी सिंदखेड पोलिसांनी खाजगी गाडी घेऊन साध्या वेशात धाड घातली असता जुगार खेळणारे व खेळविणारे असे एकूण नऊ जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील संगणक संच व रोख असा एकूण १७ हजार चारशे रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करून जुगाऱ्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करून तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दारासिंग चव्हाण यांच्या कडे देण्यात आला आहे.

हेही वाचा - नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केली वाळूमाफियांवर कारवाई

अवैध व्यवसायावर सिंदखेड पोलिसांची सलग कारवाई

सिंदखेड पोलिसांनी ठाणे अंतर्गत क्षेत्रात अवैध व्यवसायिकांवर सातत्याने होत असलेल्या कारवायांची श्रुखला पाहता मटका गुटका जुगार व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.कारण सध्या सिंदखेड पोलीस ठाणे अंतर्गत गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक असल्याने पोलीस त्या कामात व्यस्त असतील असा काहीसा समज अवैध व्यवसायिकांनी करून घेतला होता.परंतु त्या कामातून वेळ काढून सिंदखेड पोलिसांनी मात्र कारवायांचा धडाका सुरू ठेवला आहे. या महिन्यातच साडेपाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करून सराईत गुटका तस्करा चे मुस्के आवडले होते.मटका जुगाऱ्यावर देखील सातत्याने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindkhed police raid online casino gambling den, seize computer sets with nine accused nanded news