esakal | सोयाबीनच उगवलेच नाही; मग सुरू झाला तक्रारींचा ओघ
sakal

बोलून बातमी शोधा

dhrmabad.JPG

शेतकरी आणि संकटे यांच्या नात्यात काही केल्या ताटातूट होत नाही. याचा प्रत्येय यंदाही आला आहे. यावर्षी पावसाळा चांगला आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने मान्सूनपूर्व झालेल्या दमदार पावसाने शेतकरी आनंदी झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु पेरणी होऊन आठ दिवस उलटले तरी सोयाबीन पीक न उगवल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सोयाबीन पीक उगवले नसल्याच्या तक्रारींचा ओघ कृषी विभागाकडे वाढतच आहे.

सोयाबीनच उगवलेच नाही; मग सुरू झाला तक्रारींचा ओघ

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद, (जि. नांदेड) : शेतकरी आणि संकटे यांच्या नात्यात काही केल्या ताटातूट होत नाही. याचा प्रत्येय यंदाही आला आहे. यावर्षी पावसाळा चांगला आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने मान्सूनपूर्व झालेल्या दमदार पावसाने शेतकरी आनंदी झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु पेरणी होऊन आठ दिवस उलटले तरी सोयाबीन पीक न उगवल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सोयाबीन पीक उगवले नसल्याच्या तक्रारींचा ओघ कृषी विभागाकडे वाढतच आहे.


तालुक्यातील शिवार पाहणी केली
देशात कोरोनामुळे हाहाकार उडाला. देश लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. यात शेतकरी सुद्धा सुटला नाही. यातून सावरत सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांनी उधारी व उसणवारी करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी कशी तरी तजवीज केली. कोरडवाहू शेती असणारे शेतकरी हलक्या ते मध्यम जमिनीचे शेतकरी पुन्हा पाणी मिळत नाही किंवा बाजूच्या शेतकऱ्याने पेरणी केल्यास मला पेरणी करण्यासाठी अडचण येईल म्हणून लवकर पेरणी करतात. यावर्षी मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी उरकून घेतली. आठ दिवस उलटूनही सोयाबीन पीक उगवले नाही. बाळापूर, चिकना, पाटोदा, नायगाव यासह तालुक्यातील अनेक भागातील जवळपास ४० शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून चोवीस तासात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. सोनटक्के देगलूर, तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत, सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कपिल इंगळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास आधापुरे, महाबीज प्रतिनिधी सोनटक्के आदींनी तालुक्यातील शिवार पाहणी केली.

हेही वाचा -  Breaking News : नांदेडात माजी महापौरांसह नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह


कृषी विभागाने त्वरित उपलब्ध करून द्यावे
परंतु सोयाबीन बियाणांच्या तक्रारींची व्याप्ती ही संपूर्ण तालुकाभर दिसून येत आहे. शेतात वापसा होईल तसा पेरणीचा टक्काही वाढत आहे. असे असले तरी तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची उगवण क्षमतेसंदर्भात गंभीर तक्रारी समोर येत आहेत. गावोगावी असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याने त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांची आपण पेरलेले उगवेल की नाही? या प्रश्नाने झोप उडवली आहे. याविषयी शेतकरी प्रथम ज्या दुकानातून बियाणे घेतले आहे. त्यांना आपली तक्रार करत आहे. परंतु सदर दुकानदार अशा शेतकऱ्यांना गोड बोलून तक्रार करण्यापासून रोखत आहेत. तर काही दुकानदार हात वर झटकत असल्याने संतापलेला शेतकरी आक्रमक होऊन दुकानासमोर गोंधळ घालीत असल्याने कृषी बाजारपेठेत गर्दी होऊन एकच खळबळ उडत आहे. सोयाबीन पीक उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे गतिमान करावेत, बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर व कृषी सेवा केंद्र चालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीकरिता सोयाबीनचे दर्जेदार बियाणे कृषी विभागाने त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकाऱ्यांतून जोर धरीत आहे.

विश्वासार्ह बियाण्यांनी लावली वाट
बियाण्यांत विश्वासार्ह व प्रमाणित (सर्टीफाईड) असे काही प्रमुख प्रकार असतात. यापैकी शेतकऱ्यांनी शक्यतो कंपन्यांचे प्रमाणित बियाणे पेरणे गरजेचे असते. परंतु बाजारात या बियाणांची वानवा आणि विश्वासार्ह बियाण्यांचा बोलबाला असतो. प्रत्येक शेतकरी हा हुशार नसतो. त्याला टॅगवरील छापील विवरण समजत नाही किंवा ते अवलोकन करण्याची सवय नसते. याचा फायदा बाजारातील व्यापारी व उत्पादक कंपन्या घेतात. त्यामुळे जोखिमस्तर जास्त असलेले विश्वासार्ह बियाणे सहज विकले जाते. याकडे कृषी विभागही डोळेझाक करते. यामुळेच यंदा शेतकऱ्यांना उगवण क्षमता संदर्भात समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top