नांदेड : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

प्रमोद चौधरी
Tuesday, 13 October 2020

अर्धापूर तालुक्यातील प्रक्षेत्रांतर्गत पिंपळगाव व कामठा ही दोन केंद्र असून एकूण जिल्हा परिषदेच्या २२ शाळा आहेत. या शाळांतील एकूण ६० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.  

नांदेड : शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात पिंपळगाव (ता.अर्धापूर) बिटमधील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्नांच्या जोरावर घवघवीत यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. बीटमधून एकूण ६८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.  

शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ यांच्या पुढाकाराने आणि केंद्रप्रमुख व्यंकट गिते, विनोद देशमुख यांनी शैक्षणिक वर्ष आरंभापासूनच शिष्यवृत्ती परीक्षेच्या जादा तासिका, शिकवलेल्या प्रत्येक घटकावर छोट्या परीक्षा, गृहपाठ, वैयक्तिक फिडबॅक व अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी केंद्रस्तर तसेच बीटस्तरीय चाचणी सराव फेऱ्या असे नियोजन केले होते. त्याला बिटमधील सर्व शिक्षकांनी प्रतिसाद दिल्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसला तोडीस तोड असे हे दैदिप्यमान यश मिळू शकले, अशी चर्चा पालकांमधून होत आहे.

हेही वाचा - Video - नांदेडमध्ये उमेद प्रकल्पातील महिलांचा आक्रोश

असे केले नियोजन
सुनियोजित व शिस्तबद्ध तयारी, शाळा भेटींदरम्यान दिलेल्या सूचना, प्रत्यक्ष वर्गभेटी व मूल-भेटीद्वारे तयारीची चाचपणी, बैठकांतील नियमित आढावा, मुख्याध्यापकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि शिक्षकांची सातत्यपूर्ण मेहनत हेच या यशाचे गमक आहे. शिक्षकांनी व्हर्चूअल क्लास, व्हाॅटसप ग्रुप, स्वाध्यायपुस्तिका, गृहभेटी, छोटे व्हिडिओ, शिक्षकमित्र आदी विविधांगी प्रयत्नांद्वारे केवळ क्रमिक पाठ्यक्रमच नाही, तर शिष्यवृत्ती, नवोदय, NMMS अशा स्पर्धा परीक्षांची तयारीदेखील नियमित सुरू ठेवलेली आहे.

येथे क्लिक कराच - सोमवारी ७४ अहवाल पॉझिटिव्ह, २३५ रुग्ण कोरोनामुक्त ः एकाचा मृत्यू

या शाळांचा आहे समावेश
केंद्रिय प्राथमिक शाळा पिंपळगाव (१२), जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव (सहा), प्राथमिक शाळा दाभड (१०), प्राथमिक शाळा दिग्रस (तीन), प्राथमिक शाळा शेलगाव (चार), केंद्रिय प्राथमिक शाळा कामठा (तीन), प्राथमिक शाळा उमरी (चार), प्राथमिक शाळा धामदरी (दोन), प्राथमिक शाळा गणपूहर (पाच), प्राथमिक शाळा सावरगाव (एक), प्राथमिक शाळा कोंढा (तीन), प्राथमिक शाळा देगाव (तीन) तसेच खाजगी/स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील आठ असे एकून पिंपळगाव बिटमध्ये ६८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. 

सातत्य ठेवल्यानेच मिळले यश
निखळ बांधिलकी आणि प्रतिकुल परिस्थितीतही प्रयत्नांतील सातत्य असेलतर डोळे दिपवून टाकणारं अत्त्युच्च यश पदरात पाडून घेता, हे पिंपळगाव बिटमधील शिक्षकांनी दाखवून दिले आहे.
- सुचिता खल्लाळ, शिक्षण विस्तार अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success In Scholarship Examination Of ZP Schoool Students Nanded News