सोपान शिंदे यांनी तुती लागवडीतून केला शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत

प्रमोद चौधरी
Tuesday, 29 September 2020

सोपान शिंदे यांनी निराश न होता शेती विकासाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत कमी खर्चामध्ये सुधारित पीक व्यवस्थापनाकडे लक्ष देवून पीक उत्पादन वाढवले.  

नांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेतीचा व्यवसाय परवडत नाही. असे असलेतरी, अनेक शेतकरी त्यातूनही मार्ग काढून अर्थकारणाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक शेतकरी आहे सोपान रामराव शिंदे. यांनी तूती लागवडीतून शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत तर केलाच, शिवाय इतर युवा शेतकऱ्यांनाही प्रेरणा देत आहेत.


शेतकऱ्यांना तुती लागवडीविषयी माहिती देताना सोपान शिंदे

पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर पांगरा शिंदे हे गाव आहे. तेथे सोपान शिंदे यांची एकत्रित सात एकर शेती आहे. शेतीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, हळद आदी पीक घेतले जाते. परंतु, सध्या निसर्गाच्या लहरीपणा तसेच बाजारभावामुळे पारंपरिक शेती करणे शक्य नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सोपान शिंदे यांना बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले. परंतु निराश न होता शेती विकासाकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरवात केली. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत कमी खर्चामध्ये सुधारित पीक व्यवस्थापनाकडे लक्ष देवून पीक उत्पादन वाढवले.


कोष तयार झाल्यानंतर ते विक्रीला नेण्यासाठी त्याचे वजन केले जाते.

अशी केली पाण्याची बचत
उत्पादनामध्ये वाढ करावयाची असेलतर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. ही सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सोपान शिंदे गांडूळ खत, कंपोष्ट खत, हिरवळीच्या खतांचा वापर करतात. त्यांनी बायोगॅस बांधलेला असून त्याची स्लरीदेखील पिकांना दिली जाते. पाणी कमी पडू नये म्हणून  शेताजवळील नाल्यावर वनराई बंधारे बांधले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उताराला आडवी पेरणी करतात.  पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक, तुषार सिंचनाचा वापर केला जातो. याचबरोबरीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी दोन लाख लिटर साठवण क्षमतेचे शेततळे तयार केलेले आहे.


शेडमध्ये कोष तयार अवस्थेत काळजी घेताना सोपान शिंदे

रेशीम शेतीला केली सुरवात
पारंपारिक शेतीला सोपान शिंदे यांनी रेशीम शेतीची जोड दिली. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी तुती लागवड, रेशीम कोष उत्पादनाचे बारकावे जाणून घेतले. रेशीम शेती सुरु करण्याबाबत गावातीलच शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु त्यावेळी शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोपान शिंदे यांनी ‘एकटा चलो रे’ची भूमिका घेत २०१४ मध्ये दीड एकर क्षेत्रावर तुतीच्या ‘व्ही-एक’ जातीची लागवड केली. परंतु, पावसाचा खंड पडला. तुतीची वाढ खुंटली. प्रतिकुल परिस्थितीत तुतीची झाडे जिवंत ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी जिद्द न सोडता टॅंकरद्वारे पाणी विकत घेऊन तुती लागवड वाचवण्यात शिंदे यांना यश आले.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू
 
अख्ख कुटुंबच राबतेय शेतात
सध्या मजुरांचा प्रश्‍न असल्याने सोपान शिंदे यांच्यासह वडील रामराव, आई अन्नपूर्णाबाई,पत्नी सत्यभामा, भाऊ कुंडलिक, भावजय प्रतिभा हे कुटुंबातील सदस्य शेती तसेच रेशीम शेतीमध्ये रमलेले आहेत. त्यामुळे मजुरांची गरज भासत नाही शिवाय खर्चातही मोठी बचत होत आहे. फक्त रेशीम कोष काढणीसाठी गरजेनुसार मजूर घेतले जातात.  
 
चाळीस शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा
शिंदे यांनी  सध्याच्या परिस्थितीमध्ये रेशीम शेती किफायतशीर कशी आहे, हे गावातील तरुण शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे पांगरा शिंदेच नाहीतर परिसरातीलही युवा शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले आहेत. शेतकऱ्यांना गावामध्येच तुती रोपे उपलब्ध व्हावीत म्हणून शिंदे यांनी स्वतःच्या शेतामध्येच रोपवाटिका तयार केली. गावातील ४० शेतकऱ्यांनी १०० एकरावर तुती लागवड केली असून, सध्या २९ शेतकरी रेशीम शेतीमध्ये कार्यरत आहेत. दर महिन्याला उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी मिळाली आहे.

लाॅकडाउनमुळे दराचा फटका
रेशीम कोषांना चांगले दर मिळतात म्हणून बंगलोर एक्स्प्रेसने रेशीम कोष रामनगरामला पाठवितो. परंतु, सध्या लाॅकडाउनमुळे रेल्वे बंद असल्यामुळे पूर्णा येथील मार्केटमध्ये कमी दराने कोषाची विक्री करावी लागत आहे.
- सोपान शिंदे, प्रगतशिल शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story Of Progressive Farmer Sopan Shinde Nanded News