आश्‍चर्य: जप्त वाळूला पाय फुटले...कुठे ते वाचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हदगाव तहसिलच्या पथकाने जप्त केलेली वाळू अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तर दुसऱ्या घटनेत देगलुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर कारावई करून दहा जुगारी अटक तर २१ हजार रुपये जप्त. 

आश्‍चर्य: जप्त वाळूला पाय फुटले...कुठे ते वाचा?

नांदेड : अवैध वाळू उपसा करून वाहतुक करतांना हदगाव तहसिलच्या पथकानी २१ हजाराची वाळू जप्त केली होती. मात्र जप्त वाळू अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मार्लेगाव (ता. हदगाव) शिवारात घडली. वाळूचोरीचा गुन्हा मनाठा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून वाळू पाय फुटल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आहे. 

कयाधू नदी हदगाव तालुक्यातील मार्लेगाव परिसरातून वाहते. या नदी पात्रातून वाळू माफिया अवैध वाळू उपसा करून साठा करुन ठेवतात. या वाळू माफियांविरूध्द जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून हदगाव तहसिलच्या पथकाने कारवाई करून २१ हजाराची पाच ब्रास वाळू जप्त केली. मार्लेगाव शिवारात जप्त करून ठेवलेली वाळू अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तहसिलचे पथक जप्त वाळू पाहण्यासाठी व सुरक्षीतस्थळी हलविण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी जप्त केलेली वाळू आढळून आली नाही. त्यांनाही धक्का बसला. शेवटी मार्लेगावचे पोलिस पाटील दिगांबर मेघश्‍याम कदम (वय ४४) यांनी मनाठा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मनाठा पोलिस ठाण्यात अज्ञात वाळू चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्‍याम वडजे करत आहेत.

हेही वाचा प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना पोलिस कोठडी
 
आंतरराज्य जुगार अड्ड्यावर छापा 

तेलंगना व कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्याच्या सिमेवर असलेल्या शेळगाव (ता. देगलूर) शिवारात हा जुगार अड्डा सुरू होता. देगलुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू आहेत. वाळू तस्करी या परिसरातून मोठ्या प्रमाणात होत असते. स्थानिक पोलिस या धंदेवाल्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या भागात जुगार, वाळू, गौण खनीज, मटका, हातभट्टी, देशीची अवैध वाहतुक आदी अवैध धंदे जोरात सुरू आहेत. 

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे आदेश

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस निरीक्षक देगलूर यांना समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या आंतरराज्यी जुगार अड्ड्यावर सोमवारी (ता. सहा) कारवाई केली. यावेळी पोलिसांनी जुगार अड्ड्यावरुन दहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून नगदी व जुगाराचे साहित्य असा २१ हजाराचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी फौजदार जनाबाई आश्रूबा सांगळे यांच्या फिर्यादीवरुन देगलुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. आलेवार करत आहेत. 
 

loading image
go to top