कोरोना संकटातही विद्यार्थ्यांसाठी नांदेडमधील शिक्षकांची बाजी, पण...

Nanded News
Nanded News

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शिक्षण प्रक्रिया जणू स्तब्ध होऊन जाते की काय, अशा भयप्रद दिवसांत ‘लर्निंग फ्राॅम होम’ या उपक्रमांमध्ये सक्रिय राहून, जिल्ह्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची काळजी करून, ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे शिक्षण गतिशील ठेवले आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले आहे.

एकीकडे काही शिक्षण जिवची बाजी लावून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. तर काही नकारात्मक वृत्तीचे शिक्षक सोशल मिडियावर विसंगत पद्धतीने मेसेज टाकत आहेत. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणामध्ये विसंगती येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांचेमत खास ई-सकाळच्या वाचकांसाठी जाणून घेतले आहे. 

प्रशांत दिग्रसकर म्हणाले की, खरे तर आपलं शैक्षणिक वर्ष तसं १५ जून पासूनच सुरू झाले आहे. शासन निर्णयानुसार १५ जून रोजी सर्वच शिक्षकांनी आपापल्या शाळेत उपस्थित राहून पाठ्यपुस्तकांचे वाटप, शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठका, अभिलेखे, मूल्यमापन नोंदी, वर्गोन्नती आदी कामे केलेली आहेत. या जागतिक संकटात आरोग्यकर्मी, पोलीस दल ज्याप्रमाणे सर्वस्व पणाला लावून आपल्या निरामय जीवनासाठी योद्धे होऊन या लढाईत उतरले, त्याच भावनेतून शिक्षकही शिक्षण प्रक्रिया अखंडित ठेवण्याच्या भूमिकेतून विविध मार्गाने मुलांना शिकवणं अखंडीत ठेवले आहे.

कर्तव्यापासून दूर जावू नये
काही माणसं मुळातच नकारार्थी असतात. स्वत:च्या कर्तव्यास सोईस्कर दुर्लक्ष करून फक्त सोयीचा अर्थ काढून अनर्थ करण्यात धन्यता मानतात. शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. त्या निर्मात्यांच्या मांदियाळीत असे घुसखोर उदात्त निर्माणाला कलूषित करण्याचा प्रयत्न करतात. आपणही मग अशा भपकेबाज शब्दांनी क्षणभर संभ्रमित होतो. नकळतपणे आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ लागतो. अशा लोकांना कर्तव्यासाठी कोरानाची भीती वाटते आणि स्वार्थापुढे कोरोनाचं काहीच नसते. कामाच्या वेळी एकीकडे शासन निर्णयाचं कारण सांगायचं आणि दुसरीकडे शासन निर्णयानुसार काही बाबी बंधनकारक असतात, तेव्हा सहानुभूतीची याचना करायची. 

विश्‍वासाला तडा जावू देवू नका
त्यामुळे जे शिक्षक अविरत अध्यापनाचे काम करत आहे अशांनी भूलथापांना बळी पडून समाज आणि व्यवस्थेच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. लक्षात घ्या की, शिक्षण प्रक्रियेसाठी आपण आहोत, आपल्यासाठी शिक्षण प्रक्रिया नाही. शिक्षण प्रक्रियाच थांबली तर आपण समाजासाठी निरूपयोगी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अनुदानित शाळांतील, विशेषतः जिल्हा परिषद शाळांतील बहुसंख्य मुले ही सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतील आणि बव्हंशी ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्या कष्टकरी पालकांना, आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नापेक्षा शिक्षणाचे महत्त्व नाही. म्हणून खरी गरज आणि भूमिका इथे आहे.

येथे क्लिक कराच - प्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली
 
मुलांशी सतत संपर्कात राहा
त्यासाठी शिक्षकांनी आपले काम नियोजनपूर्वक आणि सातत्याने होणे आवश्यक आहे. म्हणून शाळेत जाल तेव्हा सुरक्षिततेची काळजी घेऊन ही प्रक्रिया अखंडित ठेवावी. आणि घरी असाल तेव्हा अत्यंत सुनियोजित काम करावे. आपला विद्यार्थ्यांशी संवाद असावा. शालेय दिनदर्शिकेचे पालन अंमलबजावणी होण्यासाठी संपर्काचे कोणतेही माध्यम वापर करून वेळप्रसंगी शिक्षक मित्र तयार करून मुलांशी संपर्क प्रस्थापित करणे आवश्यक आहे. आपला नियोजनानुसार अभ्यासक्रम पुढे जावयास हवा.

शिक्षकाचे व्रत जपावे
आपलं मूल ज्या शाळेत शिकतं, तिथं त्याला जसं शिक्षण मिळावं ही अपेक्षा आणि काळजी आपणास असते, तीच काळजी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची असली पाहिजे तरच आपल्या शिक्षकी व्रताला अर्थ आहे. ही जबाबदारी स्वीकारून, बांधिलकीने या प्रतिकूलतेतही जिल्ह्यातील अनेक शिक्षक खूप लक्षणीय काम करत आहेत.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com