esakal | अवघड क्षेत्रातील गावांच्या शाळांची यादी अंतीम; नांदेड जिल्ह्यातील ४८ शाळांचा समावेश

बोलून बातमी शोधा

शाळा
अवघड क्षेत्रातील गावांच्या शाळांची यादी अंतीम; नांदेड जिल्ह्यातील ४८ शाळांचा समावेश
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने अवघड क्षेत्रातील गावांच्या शाळांची यादी बुधवारी (ता. २८) अंतीम करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील केवळ ४८ शाळाच पात्र ठरविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अवघड क्षेत्रातील असंख्य निकषपात्र शाळा असतानाही त्यांचा विचार केलेला नसल्याने शिक्षकांमधून खदखद व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक या संवर्गीय आॅनलाईन सार्वत्रिक बदल्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र या विभाजनानुसार होतात. तसे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागाने सात एप्रिल रोजी निर्गमित केलेल्या सुधारीत धोरणात दिले आहे. अवघड क्षेत्राचे सात निकषही शासनाने ठरवून दिले आहेत. तसेच अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे अनुक्रमे अध्यक्ष व सदस्य सचिव असलेली सहा सदस्यीय समिती गठीत केली गेली. समितीने दिलेल्या अहवालानुसार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्रातील ४८ गावांच्या शाळांची यादी पात्र ठरवून त्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा - नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार

शैक्षणिक नुकसानसह गुणवत्ता घसरणार ः

शासनाने ठरवून दिलेल्या सात निकषामध्ये जिल्ह्यातील अनेक गावच्या शाळांचा समावेश होवू शकत असतानाही त्या शाळांना निष्कासित ठरविण्यात आल्याने शिक्षकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी २०० ते २५० शाळांचा अवघड क्षेत्राच्या यादीत समावेश होता. अवघड क्षेत्रातील शाळांवरील शिक्षकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची तरतूद आहे. परंतु, अनेक निकषपात्र शाळा या यादीतून वगळण्यात आल्याने त्या सर्वसाधारण क्षेत्रात अंतर्भूत झाल्या आहेत. आता या शाळांवरील पद रिक्त राहिल्यासही कुणास सोयरसुतक नसणार आहे. त्यामुळे एकीकडे शिक्षकांवर अन्याय तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानासह शाळांची गुणवत्ता घसरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे